महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
चिरनेरच्या इको फ्रेंडली बचतगटाची भरारी शनिवार, ११ जानेवारी, २०२०
काळ बदलला की माणसाची जीवनशैली देखील बदलत जाते. आणि त्यानुसार सवयी देखील बदलतात. शहरी जीवनशैलीत रमणारा माणूस विहीर, झाडाचा पार, शेत, कौलारू घर, मातीची कुंपण, जनावरांचा गोठा, बांबू आणि कडब्यापासून तयार होणारी झोपडी याबद्दल आकर्षणात रमतो. अगदी अलीकडे तर अनेक चांगल्या हॉटेलमध्ये मोठे फलक लावून चुलीवरचे जेवण मिळेल असे तर लिहले जातेच ! मात्र मातीच्या भांड्यात शिजवलेले ताजे पदार्थ मिळतील असेही फलक आता दिसतात. हाच धागा पकडून रायगड जिल्ह्यातील चिरनेर येथील बचतगटाने मातीच्या विविध वस्तू तयार करायला सुरुवात केलीय आणि त्याला अधिक यशही मिळतयं, हे विशेष होय.

सद्या इको फ्रेंडली वस्तू वापरण्याकडे लोकांचा कल अधिक आहे. त्यातही मधल्या काळात वापरातून गेलेली मातीची भांडी पुन्हा एकदा दिसू लागली आहेत. मातीची भांडी पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. चिरनेरमधल्या कुंभारवाड्यातल्या महिलांनी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून माजीची भांडी बनवायला सुरुवात केली. परंपरेने आलेल्या मातीकला उद्योगाची जोड देत या महिलांनी आता उद्योजिका म्हणून व्यवसायात पाय रोवले आहेत. चिरनेर गावात अनेक बचतगट आहेत. बचतगटाच्या माध्यमातून महिलांमध्ये येत असलेला आत्मविश्वास आणि हातात राहणारे पैसे हे इतर महिलांना नेहमी प्रेरणा देत असतात. आपणही बचतगट सुरु करावा आणि आपल्याबरोबर इतर महिलांनाही सहकार्य करावे या भावनेतून बिनर्स या बचतगटाची स्थापना झाल्याचे रोशनी सुनील चौलकर सांगतात.

पापड, फराळाचे पदार्थ बनविणारे गट खूप आहेत. मात्र मातीचे काम करणाऱ्या गटांची संख्या खूप कमी आहे. त्यातही आपल्या घरात असलेल्या मातीकामात आपण पारंगत आहोत. त्यामुळे गटाच्या माध्यमातून तेच काम करावे या इच्छेतून गटाने हे काम सुरु केले. नवीन पिढीने मातीचे काम करावे आणि परंपरागत चालत आलेल्या व्यवसाय सांभाळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्या सांगतात. मातीकामचं करायचे हे ठरले पण त्यासाठी कोणीतरी अनुभवी महिला सदस्याची आवश्यकता होती. त्याचवेळी पूनम दिलीप हातनोलकर यांच्याशी ओळख झाली. आणि पूनमताईंनी या महिलांना मातीकामातले बारकावे शिकवले. पारंपरिकतेतून आधुनिक विचार सुरु झाला. कल्पना स्थानिक ठेवावी आणि विचार जागतिक करावा यानुसार मातीला वेगवेगळा आकार देणं सुरु झालं.

वाढत्या महागाईचे चटके बसू लागले आणि आपणही संसाराला हातभार लावावा ही इच्छा निर्माण झाली. गावातच राहणाऱ्या एका महिलेकडून मातीची भांडी बनविण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा शिकून घेतली आणि अवघ्या तिसऱ्याच दिवशी स्वत:च्या हाताने भांडी बनवता आली. तेव्हाच ठरवलं की आपण हे मातीचं काम करूनच स्वत:च्या पायावर उभं राहायचे. गेली पाच वर्ष हा घरगुती स्वरुपातला उद्योग करत होते. आता मात्र बचतगटाच्या माध्यमातून व्यापारी पेठ मिळाली.

पणतीपासून मातीची भांडी, माठ, मच्छी, डोसे बनविण्यासाठी वापरात येणारे भिन, अहोरात वापरल्या जाणाऱ्या शोभेच्या बाहुल्या, छोटे जाते, चूल, बचतगटाच्या माध्यमातून बनविले जातात. बचतगट नवीन असला तरी आमचा अनुभव या कामात आम्हाला अनेक अडचणींवर मात करायला शिकवतो. आज अनेक महिंलाना मातीची भांडी वापराची इच्छा असते, त्यामुळे आम्ही गॅसवर उपयोगात येऊ शकणारी भांडीही बनवायला सुरुवात केली. ही भांडी वापरताना पहिल्यांदा तांदुळाच्या पीठ भांड्यात कमी आचेवर भाजून घ्या. पीठ काळे झाल्यानंतरच हे भांड धुवून घ्या. नंतर भांडे वापरण्यासाठी तयार असते.पारंपरिक व्यवसायाला कष्टाची आणि थोड्या मार्केटिंगची जोड मिळाली तर महिला कोणताही उद्योग सहजपणे हाताळू शकतात. उभा करू शकतात. याचंच एक उदाहरण आहे.

शेतातली माती दोन दिवस भिजत घालून पातळ करतात. माती गाळण्याच्या मडक्यात माती घालून सुकवली जाते. साधारण तीन दिवसांनी माती सुकली की त्यात राबाडी घालून मळून घेतली जाते. या मिश्रणाचे गोळे तयार करून साच्यामध्ये त्याला आकार दिला जातो. कच्चा स्वरुपात तयार झालेल्या खापऱ्या घरात पुन्हा चार दिवस सुकवल्या जातात. मग पुन्हा उन्हात सुकवून त्या भट्टीमध्ये भाजल्या जातात. यामध्ये काहीवेळा ही भांडी व्यवस्थित सुकली नसतील तर भट्टीत पुन्हा माती होते. आणि नुकसान होते. या सर्व प्रक्रियेला साधारण आठ दिवस लागतात.

बदलत्या काळात मातीची भांडी लोकांना खूप आवडू लागली आहे. महालक्ष्मी सरसमध्येही याला अधिक मागणी असते. या भांड्यातून तयार होणारे पदार्थ अधिक चविष्ट होतात. म्हणूनच इको फ्रेंडली बचतगट सर्वांनाच आवडता झाला आहे.

वनिता कांबळे
माहिती सहायक
विभागीय माहिती कार्यालय,
कोकण भवन, नवी मुंबई
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा