महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पन्हाळागड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेस प्रारंभ शनिवार, ०७ जुलै, २०१८
तरूणांनी छत्रपतींचा कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षणाबरोबरच संस्कार, चारित्र्य आणि शौर्य निर्माण करावे - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :
पन्हाळागड ते पावनखिंड या पदभ्रमंती मोहिमेतून तरूणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासकालीन आठवणी आणि स्मृती जोपासून छत्रपतींचा इतिहास आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षणाबरोबरच संस्कार, चारित्र्य आणि शौर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

हिल रायडर्स ॲडव्हेंचर फौंडेशनच्यावतीने वीर शिवा काशिद व नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या 358 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या पन्हाळगड ते पावनखिंड या 51 व्या पदभ्रमंती मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पन्हाळगडावरील नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापासून करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या समारंभास पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल, विजय देवणे, हिल रायडर्स ॲडव्हेंचर फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील, विमेन्स वेलफेअर फौंडेशनचे संस्थापक अजितसिंह काटकर, संजिवनीचे चेअरमन पी. आर. भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर बाजीप्रभू देशपांडे हे ज्या मार्गावरून धावले त्याच मार्गावरून पन्हाळागड ते पावनखिंड ही पदभ्रमंती मार्गस्थ होत आहे, ही अभिमानची बाब आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमितून छत्रपतींच्या इतिहासाच्या आठवणी, चरित्र आणि कार्यातून तरूणांना निश्चितपणे प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, ही केवळ पदभ्रमंती नसून निसर्गाचा सहवास, साहसी वृत्ती, दुर्ग भ्रमंती या गोष्टीही या मोहिमेत तरूणांना मिळून इतिहासाच्या पाऊलखुणांची जोपासणा होऊन समृद्ध दुर्ग पंरपरा आणिा जाज्वल्य इतिहास आणि छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमिचे रक्षण, सरंक्षण करून प्रेरणास्त्रोत म्हणून ही मोहीम यशस्वी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

पदभ्रमंती मोहिमेतील सहभागी तरूण-तरूणी, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, दोन दिवसांच्या या पदभ्रमंती मोहिमेत सहभागी लोकांसाठी मुक्कामाच्या दृष्टिने प्रशस्त हॉलची उभारणी केली आहे. यापुढील काळातही ट्रेकर्स आणि पर्यटकांचा प्रवास / पदभ्रमंती सुखकर व्हावी, या दृष्टिने आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या पदभ्रमंती माहिमेत निसर्ग जपता जपता पक्षी, वृक्ष, पाऊलवाटा, डोंगर-दऱ्या अशा नवनवीन ठिकाणांचाही अनुभूती घ्या, असेही ते म्हणाले.

प्रारंभी विनोद कांबोज यांनी या पदभ्रमंती मोहिमेविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, 33 वर्षापासून सुरू असलेले ही पदभ्रमंती मोहीम आजअखेर यशस्वीपणे सुरू असून येत्या डिसेंबरमध्ये आयेाजित करण्यात येणारी पन्हाळागड ते पावनखिंड ही पदभ्रमंती मोहीम ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, या दृष्टिने फाऊंडेशनचे प्रयत्न सुरू आहेत.

हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी यावेळी सांगितले की, पन्हाळागड ते पावनखिंड ही पदभ्रमंती मोहीम 51वी असून यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक यासह बहुतांशी जिल्ह्यातील तसेच कर्नाटक आणि गोवा राज्यातूनही अनेक गिर्यारोहक या पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झाले आहेत. आजच्या पदभ्रमंती मोहिमेत सुमारे 900 मुले-मुली तसेच अबालवृद्ध सहभागी झाले आहेत. पन्हाळगडावरील नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली ही मोहीम पुढे तुरूकवाडी, म्हाळूंगे, मसाईपठार, कुंभारवाडी, खोतवाडी, मांडलाईवाडी, करपेवाडी, आंबवडे येथील मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी कळकेवाडी, रिेंगेवाडी, माळवाडी, पाटेवाडी, धनगरवाडा, माण, पांढरेपाणी आणि पावनखिंड अशी जाणार आहे. दोन दिवसांच्या या मोहिमेत 46 किलोमीटरचा ट्रेक केला जाणार आहे.

शालेय मुलींचे लेझीम पथक आणि लाठ्या -काठ्यांच्या मैदानी खेळ तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, नरवीर बाजीप्रभू देशपांडे की जय, वीरशिवा काशिद की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला. पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते पन्हाळा नगरपरिषदेच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर पदभ्रमंती मोहिमेस झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

समारंभास हिल रायडर्स ॲडव्हेंचर फौंडेशनचे युवराज साळुंखे,चंदन मिरजकर,विनोद कांबोज, सूरज ढोली (गुरव) माजी नगराध्यक्ष आशिफ मोकाशी, बाळासाहेब भोसले, प्रांताधिकारी अजय पोवार,तहसिलदार अनंत गुरव, प्रभारी गटविकास अधिकारी शरद भोसले, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.कैलास चव्हाण, तालुका वन अधिकारी प्रियांका दळवी यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा