महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आचारसंहितानंतर झालेल्या पहिल्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद सोमवार, १० जून, २०१९


अकोला :
लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर सुमारे साडेतीन महिन्यानंतर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जनता तक्रार निवारण सभा पार पडली. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आज विविध विभागांच्या ९५ नवीन तक्रारी प्राप्त झाल्या. पालकमंत्री यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन १५ दिवसाच्या आत तक्रारींचा निपटारा करण्यात येईल, असा दिलासा दिला.

जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जीतेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे महसूल विभाग - २८  तक्रारी, पोलीस विभाग -१०, जिल्हा परिषद - १२, मनपा - १४, विद्युत विभाग - ०८, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था - ०२, भूमी अभिलेख - ०४, कृषी विभाग - ०२, जिल्हा अग्रणी बँक - ०८, वनविभाग - ०१, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना - ०२, सार्वजनिक बांधकाम विभाग - ०२, मत्स्य विभाग - ०१ इतर - ०१ तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या.

तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील सभेत प्राप्त तक्रारींवर अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी करून विभागवार आढावा घेतला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा