महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रत्नागिरीच्या पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट शुक्रवार, १० जानेवारी, २०२०


नवी दिल्ली :
रत्नागिरी येथील दैनिक रत्नभूमी पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वैविध्यपूर्ण कार्याची माहिती जाणून घेतली.

परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या ‘रत्नवार्ता’ प्रायोगिक अनियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले.

दिल्ली अभ्यास दौऱ्यावर असणाऱ्या या २० विद्यार्थी व विद्यार्थीनींनी अभ्यास दौऱ्याचे समन्वयक तथा पत्रकारिता विभाग प्रमुख धनश्री पालांडे आणि विभागाचे संयोजक अंकुश कदम यांच्यासह आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी औपचारिक वार्तालापही झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती उपसंचालक दयानंद कांबळे यांनी दिली. महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय व महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शासनाचा जनसंपर्क सांभाळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची उदाहरणांसहीत माहितीही श्री.कांबळे यांनी दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे तीन भाषेतील अधिकृत व प्रमाणित ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस, युट्युब चॅनेल, ब्लॉग, इंस्टाग्राम, व्हॉटसॲप गृप आदींच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यात येणारी शासनाची प्रसिध्दी याविषयीही श्री. कांबळे यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.

उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण कार्याविषयीचे सादरीकरण केले.


‘रत्नवार्ता’ चे प्रकाशन

दैनिक रत्नभूमी पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तयार केलेले ‘रत्नवार्ता’ प्रायोगिक अनियतकालिकाचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या अनियतकालिकाचे हे ११ वे वर्ष असून एकूण ८ पानी अनियतकालिकात विद्यार्थ्यांच्या स्वत: वार्तांकन केलेल्या, संपादीत केलेल्या बातम्या व त्यांनी गोळा केलेल्या जाहिराती आहेत.

श्री. कांबळे यांनी या अनियतकालिकातील बातम्या व मांडणीबाबत संपादक मंडळाचे कौतुक केले. या उपक्रमासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा