महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
हृदयरोगाशी संबंधित कठीण शस्त्रक्रिया पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून यशस्वी सोमवार, ११ जून, २०१८
कोल्हापूर : आर्थिक परिस्थितीमुळे हृदयरोगाशी संबंधित कठीण शस्त्रक्रिया करणे अशक्य असणाऱ्या मुलांवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शस्त्रक्रिया झालेले बालक व त्यांच्या पालकांसह अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.

काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयरोगाशी संबंधित ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे २ डी ईको व हृदयरोग तपासणीचे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले होते. शिबिरामध्ये 288 बालकांचे २ डी ईको करण्यात आले होते. यामधील सदोष 58 पैकी 26 बालकांवर मुंबई व कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले. उपचार कालावधीत रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व नातेवाईकांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वत: जातीने लक्ष घालून तेथील निवास, भोजन व प्रवासाच्या खर्चासह संपूर्ण व्यवस्था केली होती. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गोरगरिबांच्या कल्याणासाठी सदैव धावून येणारे देवमाणूस असल्याच्या भावना यावेळी नातेवाईकांनी व्यक्त केल्या.

गरजू रुग्णांना तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी कावळानाका सर्किट हाऊस येथे स्वतंत्ररित्या पालकमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष कार्यरत असून हा कक्ष गरजूंना सर्वतोपरी आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सदैव कार्यरत असल्याने या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.

याप्रसंगी पणनचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे, संदीप देसाई, आरोग्य समन्वयक अनिकेत मोरबाळे, धनाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा