महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यात पोल्ट्री केंद्र स्थापन करावे - सुभाष देसाई शुक्रवार, ०८ फेब्रुवारी, २०१९


नाशिक : शेतकऱ्यांना प्रतिकुल परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या आधार देण्यासाठी पूरक व्यवसाय महत्त्वाचा असून त्यादृष्टीने जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसायाच्या प्रचारासाठी पोल्ट्री केंद्र स्थापन करावे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

ठक्कर डोम येथे आयोजित ‘पोल्ट्री एक्स्पो २०१९’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ब्रिडर असोसिएशनचे अध्यक्ष सी. वसंतकुमार, वेंकटश्वराय हेचरिचचे महाव्यवस्थापक डॉ.प्रसन्न पेडगावकर, ब्रायलर फार्मर्स कमिटी गुजरातचे अध्यक्ष अन्नुभाई पटेल, पोल्ट्री औद्योगिक संस्थेचे सदस्य कृष्णा गांगुर्डे, उद्धव आहेर उपस्थित होते.

श्री.देसाई म्हणाले, शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसायांसाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. पोल्ट्री व्यवसायाला शेतीशी जोडण्याच्या दृष्टीने शासनाच्या कृषि औद्योगिक धोरणात त्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या व्यवसायासंबंधी समस्या सोडविणेबाबत कृषि व पशुसंवर्धन विभाग यांचे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येईल.

पोल्ट्री व्यावसायिक व शेतकरी एकत्र आल्यास या व्यवसायाला अधिक गती प्राप्त होईल. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे धवलक्रांती झाली त्याप्रमाणे पोल्ट्री व्यावसायिकांनी संघटीतपणे हा व्यवसाय पुढे न्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रदर्शनाच्या माध्यमातून पोल्ट्री व्यवसायाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मंत्री महोदयांनी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली.

उद्योगमत्र्यांची सह्याद्री फार्मला भेट

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मस प्रोड्युसर कंपनी लिमिटेडला उद्योगमंत्री सुभाषदेसाई यांनी भेट दिली. यावेळी चेअरमन विलास शिंदे, सह्याद्री फार्मचे संचालक प्रशांत जयकृष्णीय, महाएफपीसीचे महाव्यवस्थापक योगेश थोरात, प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, श्रीकृष्ण गांगुर्डे, आरती शिंदे, तुषार जगताप उपस्थित होते.

यावेळी श्री.देसाई यांनी सह्याद्री फार्मची पाहणी करुन संपूर्ण यंत्रणेची माहिती घेतली तसेच कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याची संघटीत शक्ती कशी काम करते याचा प्रत्यय आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी एकत्रित येऊन जगाच्या बाजारपेठेत स्थान निर्माण करुन शकते हे सह्याद्री फार्मसच्या माध्यमातून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मंत्री महोदयांना सादरीकरणाद्वारे कंपनीच्या कामकाजाची माहिती देण्यात आली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा