महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
युवा माहिती दूत उपक्रमातून विद्यार्थ्यांना ज्ञान व अनुभव मिळविण्याची संधी- प्राचार्य डॉ.संजय शिरोडकर शुक्रवार, ०२ ऑगस्ट, २०१९


बीड :
युवा माहिती दूत उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान व व अनुभव मिळविण्याची संधी मिळत असून विविध क्षेत्रातील मार्गदर्शक यांच्याद्वारे मिळणारी माहिती ग्रहण करून त्याचा उपयोग जीवनामध्ये केल्यास विद्यार्थ्यांना यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, अनुलोम स्वयंसेवी संस्था व स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने संयुक्तरीत्या आयोजित युवा माहितीदूत कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, उपप्राचार्य डॉ. राजेश ढेरे, एनएसएसचे जिल्हा समन्वयक डॉ. सोपान सुरवसे, कार्यक्रम अधिकारी डॉ.अशोक डोके, प्रा. दीपा देशपांडे, प्रा. अनंत देशपांडे, अनुलोम संस्थेचे जिल्हा समन्वयक बसवराज वाले व विशाल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा.डॉ.शिरोडकर म्हणाले, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त गरजेची आहे. त्याचे पालन केल्यास अशक्य ते काहीही नाही विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन बरोबरच शिस्तीचा ही जीवनात अवलंब करावा. महाविद्यालयीन कार्यक्रम व उपक्रमांद्वारे अनेक क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक तुम्हाला उपयुक्त असणाऱ्या अनेक बाबी सांगतात त्याचा उपयोग जीवनामध्ये केला जावा.

याप्रसंगी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी श्री. वाघ यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपक्रमांची माहिती दिली यामध्ये लोकराज्य, महान्यूज यासह युवा माहिती दूत, संवादिनी आदी उपक्रमांचा विद्यार्थी स्वतःसाठी आणि इतर गरजूंच्या विकासासाठी करू शकतात असे सांगितले.

यावेळी उपप्राचार्य डॉ.बाहेगव्हाणकर यांनी या उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयोग होणार असून या दृष्टीने मिळणाऱ्या माहितीचा स्त्रोत ते होऊ शकतात आणि इतरांपर्यंत पोहोचवू शकतात असे सांगितले.

एनएसएसचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉ. सुरवसे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व वाढीसाठी अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करत असल्याचे सांगून केंद्र व राज्य शासनाच्या महत्वपूर्ण योजना लोकांपर्यंत नेण्यामध्ये आणि परिवर्तन घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे मोठे योगदान असल्याचे सांगितले.

यावेळी युवा माहिती दूत उपक्रमासाठी महासंचालनालयाच्यावतीने जिल्ह्यात अनुलोम या स्वयंसेवी संस्थेमार्फत सर्व महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याद्वारे नोंदणी केली जात आहे. अशी माहिती अनुलोमचे जिल्हा समन्वयक श्री. वाले यांनी दिली.

याप्रसंगी श्री. बसवराज वाले, श्री. विशाल जोशी आणि आणि श्री. कृष्णा वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना युवा माहिती दूत अॅप डाऊनलोड करणे, सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करणे व नोंदणी करणे याचे प्रात्यक्षिकाद्वारे कार्यवाही केली. कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक डोके यांनी यांनी कार्यशाळेचे प्रस्ताविक केले, सुत्रसंचालन कु.सुजाता डोंगरे तर आभार डॉ. ओमप्रकाश झंवर यांनी व्यक्त केले.

युवा माहिती दूतमध्ये विविध तालुक्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची नोंदणी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालय आणि 'अनुलोम ' द्वारे सुरू असलेल्या युवा माहिती दूत उपक्रमाच्या विविध तालुक्यातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. के.एस.के. अन्नतंत्र महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, कृषि तंत्र निकेतन महाविद्यालय, राजुरी येथील विद्यार्थ्यांची युवा माहितीदूत संदर्भात एकत्र कार्यशाळा घेतली. मोठा प्रतिसाद मिळून २४७ विद्यार्थ्यांची युवा माहितीदूत म्हणून नोंदणी झाली. तसेच तुलसी महाविद्यालय, श्री बंकटस्वामी महाविद्यालय, सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय, आदित्य कृषी महाविद्यालयात देखील चांगला प्रतिसाद मिळाला.

माजलगाव येथील सिद्धेश्वर महाविद्यालय येथे ४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. याच बरोबर आदित्य कृषी महाविद्यालयात युवा महितीदूत साठी कार्यशाळा घेण्यात आली. तसेच आष्टी तालुक्यातील शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय मध्ये युवा माहिती दूत कार्यशाला घेतली या वेळी बसवराज वाले, किशोर काकड़े या वेळी १२४ विद्यार्थी उपस्तित होते व ४९ विद्यार्थी नोदणी झाली. जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यात युवा माहिती दूत उपक्रमांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणात नोंदणी केली जात आहे. गेवराई आणि बीड भागात १०७० विद्यार्थ्यांशी संपर्कातून ४३२ नोंदणी पूर्ण केली आहे .
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा