महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पोलिसांना हक्काचे घर मिळण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करा - दीपक केसरकर मंगळवार, ०८ जानेवारी, २०१९


सांगली : पोलिसांच्या घराचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी सामान्य जनतेचे संरक्षण करतात. त्यामुळे त्यांच्या हक्काचे घर त्यांना मिळण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिल्या.

जिल्हा पोलीस मुख्यालय येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खराट, अतिरीक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे आदि उपस्थित होते.

पोलिसांना त्यांच्या पसंतीची आणि चांगल्या दर्जाची घरे देण्यात यावीत, असे सूचित करून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, पोलिसांनी एकत्रितरीत्या एकाच ठिकाणी घराची पसंती दिली, तर अंदाजित खर्च कमी होऊ शकतो. प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचाही विचार करावा. सध्या रियल इस्टेटमध्ये असलेल्या मंदीचा फायदा होईल. तसेच, कर्जासाठी बँकाही पुढाकार घेतील. त्यामुळे पोलिसांना हक्काचे घर मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, नवीन घरांमध्ये अद्ययावत सोयीसुविधा देण्यात याव्यात. यासाठी पोलीस वसाहत मंडळ (पोलीस हाऊसिंग कार्पोरेशन) कडून आवश्यक ते मार्गदर्शन घ्यावे. पार्किंग, उपहारगृह आदि बाबींचाही विचार व्हावा. तसेच, नवीन घरांची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सध्या राहात असलेल्या घरांची डागडुजी, रंगरंगोटी, स्वच्छतागृह, पाणी व विद्युत व्यवस्था यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक घ्यावे. त्याप्रमाणे जिल्हा नियोजन समितीमधून अनुदानाची मागणी करावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस मुख्यालयाशेजारी आणि जुन्या राजवाड्याशेजारी असणाऱ्या पोलीस वसाहतीमधील पोलिसांच्या घरांबाबत चर्चा करण्यात आली. आमदार सुरेश खाडे आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या मौलिक सूचना केल्या. पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी पोलिसांच्या घरांबाबतची कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्याचा विश्वास यावेळी दिला. तसेच, आवश्यक अनुदानाची मागणी करण्याबाबतही कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. यावेळी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा