महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ॲम्फी थिएटरच्या कामाला गती द्या - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०


नागपूर :
वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त मौजा पांढराबोडी येथील विद्यापीठाच्या जागेवर प्रस्तावित ॲम्फी थिएटरच्या बांधकामाला गती द्या, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे काल (ता. 13) दिले.

छत्रपती सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी श्री. भरणे यांनी ॲम्फी थिएटरच्या बांधकामाबाबत चर्चा केली. नागपूर विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. याच धर्तीवर नागपूर शहरात विस्तीर्ण स्वरुपाचे सभागृह नसल्यामुळे ॲम्फी थिएटर सारख्या सभागृहाची निकड लक्षात घेवून दोन हजार आसनक्षमतेचे सभागृह बांधण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्ष योजनेंतर्गत मौजा पांढराबोडी येथील विद्यापीठाच्या जागेवर प्रस्‍तावित ॲम्फी थिएटरच्या बांधकामाला गती देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. या सभागृहासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून जिल्हाधिकारी, नागपूर मार्फत २० कोटींचा निधी उपलब्ध करुन दिलेला आहे.

ॲम्फी थिएटरच्या बांधकामासाठी १४४ कोटी ३४ लाख रुपयांची गरज लक्षात घेता सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यासाठीचा प्रस्ताव १२ मार्च २०१९ रोजी शासनाला सादर करण्यात आला आहे. याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा