महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पीक कापणी प्रयोगांना शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे- कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे बुधवार, ०७ ऑगस्ट, २०१९


कृषीमंत्र्यांकडून आष्टा मोड, नळेगाव, घरणी व शिरुर ताजबंद येथील शेतकऱ्यांशी संवाद
नळेगाव येथील शेती पिकांची पाहणी

लातूर :
कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर पिक कापणी प्रयोग केला जातो. त्याप्रसंगी विमा कंपन्यांचे एजंट उपस्थित राहतात. तरी शेतकऱ्यांनीही अधिक जागरुक बनून अशा पीक कापणी प्रयोगांना उपस्थित रहावे, असे आवाहन कृषि मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले.

घरणी ता.चाकूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषि मंत्री डॉ. बोंडे बोलत होते. यावेळी आमदार विनायक पाटील, गणेश हाके, उपविभागीय अधिकारी प्रभुदेव मुळे, कृषि सहसंचालक जे.एल.जगताप, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, आत्माचे प्रकल्प संचालक डी.एल.जाधव, जिल्हा कृषि विकास अधिकारी भीमदेव रणदिवे आदी उपस्थित होते.

डॉ.बोंडे म्हणाले की, पीक कापणी प्रयोगाची माहिती कृषि विभागाने शेतकऱ्यांना दिली पाहिजे. त्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. कृषि सहसंचालकांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी निर्देश दिले. भाऊसाहेब फुंडकर योजनेंतर्गत फळबाग लागवडीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच सिताफळ हे कोरडवाहू शेतीवर येणारे चांगल पीक असून या भागातील शेतकऱ्यांनी या फळपिकाचा लाभ घ्यावा. तसेच वडवळ नागनाथ मंडळातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न सोडविला जाईल, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी कृषि मंत्री डॉ. बोंडे यांनी आष्टा, नळेगाव, घरणी व शिरुर ताजबंद येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांकडून पीक परिस्थिती, पीक विमा, पर्जन्यमानाची माहिती जाणून घेतली. या टंचाईच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.नळेगाव ता.चाकूर येथील शेतकरी श्री. गुंडप्पा वैजनाथ तोडकरी यांच्या शेतातील पिकांची तसेच जमिनीतील ओलाव्याची पाहणी डॉ. बोंडे यांनी केली. तसेच शेतकरी तोडकरी यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच शेतकरी तोडकरी पहिले पीक मोडून त्यावर दुसरं पीक पेरणी करत होते. त्यावेळी डॉ. बोंडे यांनी बियाणे हातात घेऊन चहाड्यावर हात धरला व तोडकरी यांच्या शेतात त्यांनी पेरणी केली. तसेच शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा, शासन पाठिशी असल्याचा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

शिरुर ताजबंद येथे कृषि मंत्री डॉ. बोंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथे बोलताना डॉ. बोंडे म्हणाले की, राज्यात मागील वर्षी ९१ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. ४९ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. यावर्षी एक कोटी पाच लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून त्याचा लाभ पात्र शेतकऱ्यांना नक्की होईल. पीक विमा पध्दतीत त्रुटी आहेत. त्या दूर केल्या जातील, त्याप्रमाणेच एकही महसूली मंडळ पीक विमा लाभापासून वंचित राहणार नाही.

ज्या महसूली मंडळात ५० टक्के पेक्षा कमी पाऊस झाला. ज्याठिकाणी पेरण्या झाल्या नाहीत तसेच झाल्या असतील पण उगवण झाली नाही. अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या वेळी हरभरा व निविष्ठा प्रात्यक्षिक राबविताना मोफत द्याव्यात, असे डॉ.बोंडे यांनी सांगितले. शेतकरी अन्नदाता असून शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे डॉ. बोंडे यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा