महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कातकरी समाजाचा सर्वांगीण विकास करणार – डॉ. जगदीश पाटील बुधवार, ०९ ऑगस्ट, २०१७
पालघर : कातकरी समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला असून या समाजाला शासनाच्या विविध सेवा सुविधा देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणार असून यासाठी कातकरी उत्थान अभियान राबविणार असल्याचे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी केले.

कातकरी उत्थान अभियान कार्यशाळेचे उद्घाटन आज डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, अनुलोभ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. पाटील म्हणाले, जनता व प्रशासन यामधील दुवा साधन्याचे काम अनुलोभ संस्थेचे कार्यकर्ते करीत आहेत. यांच्यामार्फत शासनाच्या योजना पात्र व गरजू लाभार्थ्यांना पोहचविण्यास मदत होणार आहे. कातकरी समाजाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती समजून घेण्यासाठी सर्व्हेक्षण करणार आहे. त्यासाठी एक नमुना तयार करण्यात आला आहे. या नमुन्यामध्ये गांव पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या सहभागातून सखोल सर्व्हेक्षण करण्यात येईल. तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक व आरोग्य सेविका या गाव पातळीवरील चारही कर्मचाऱ्यांनी एकत्रितरित्या कातकरी समाजातील प्रत्येक कुटूंबास भेट द्यावी व त्यांच्याशी संवाद साधून सदर नमुन्यामधील माहिती काळजीपूर्वक जमा करावी. अशी माहिती जमा करताना कातकरी समाजातील व्यक्तींची सहानभूतीपूर्वक चौकशी करावी व त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होईल या दृष्टीकोणातून जनजागृती निर्माण करण्याच्या प्रयत्न व्हावेत. तसेच कातकरी समाजातील व्यक्तींना सर्व प्रकारचे दाखले या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून देण्यात येतील. यातून कातकरी समाजासाठी असणाऱ्या शासनाच्या सर्व योजना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, अनुलोभ संस्थेच्या प्रेरणेने कातकरी उत्थान अभियानास सुरुवात केली आहे. अनुलोभचे कार्यकर्ते शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्यातून शासनाच्या योजना जिल्ह्यातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणार आहेत.

यावेळी अनुलोभचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझे यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यातील अनुलोभचे दीड हजार कार्यकर्ते शासनाच्या सर्व लोकउपयोगी योजना गरजू व पात्र कातकरी समाजापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करतील.

कातकरी उत्थान अभियान कार्यशाळेत ग्रामविकास विभागाच्या योजना, संजय गांधी निराधार योजना व जातीचे दाखलेबाबत सादरीकरण, कृषि विभागाच्या योजना, पशू संवर्धन विभागाच्या योजना, आदिवासी विभागाच्या योजना (वन हक्कासह) तसेच कातकरी समाजाबाबत माहितीचे सादरीकरण करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा