महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिम राबविण्याचे संभाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निर्देश शनिवार, ०८ सप्टेंबर, २०१८
लातूर : जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील दिव्यांगांना वैद्यकीय प्रमाणपत्र काढण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका स्तरावर शिबीराचे आयोजन करुन दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र शून्य टक्क्यावर आणण्यासाठी विशेष मोहीम राबवा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिल्या.

संवेदना दिव्यांग अभियान अंतर्गत शासकीय विश्रामगृह लातूर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जि.प.समाज कल्याण सभापती संजय दोरवे, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री.निलंगेकर म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी ग्रामीण भागातील दिव्यांगांचे सर्वेक्षण केले आहे. परंतू 3 हजार 472 दिव्यांगाना अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाहीत, यामध्ये अहमदपूर, चाकूर, निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ तालुक्याच्या भागातील संख्या जास्त आहे. या करिता पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ तालुक्यात व तिसऱ्या आठवड्यात अहमदपूर, चाकूर या तालुक्यातील दिव्यांग व्यक्तीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी निलंगा व अहमदपूर येथे वैद्यकीय शिबीराचे आयोजन करुन दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सर्व तालुक्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये शिबीराचे आयोजन करण्यात यावे असे सांगितले. तसेच लातूर महानगरपालिकेने व जिल्ह्यातील नगर परिषदेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांगाचे सर्वेक्षण त्वरीत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना पालकमंत्री श्री.निलंगेकर यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत म्हणाले की,जिल्हयातील दिव्यांगाकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्यामुळे शासनाच्या योजनेपासून ते वंचित राहत आहे. दिव्यांगाना आरोग्य विमा योजना, घरकूल, रेल्वे, बस सवलत या योजनेचा लाभ दिव्यांगाना मिळाला पाहिजे यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कामास प्राधान्य द्यावे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी 18 वर्षावरील अनाथ, मतिमंद मुलांची समाज कल्याण विभागाने माहिती घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची सूचना दिल्या.

या बैठकीस संवेदना प्रकल्पाचे कार्यवाहक सुरेश पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.पवार, विभाग प्रमुख डॉ.गोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.परगे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी शिवकांत मिनगीरे, कैलाश उईके, अपंग विभाग प्रमुख उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा