महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पंचायतराज व्‍यवस्‍थेत महिलांचा सहभाग महत्‍वाचा - विजया रहाटकर गुरुवार, १२ जुलै, २०१८
अहमदनगर : पंचायतराज व्‍यवस्‍थेत महिलांचा सहभाग वाढतो आहे. ही कौतुकास्‍पद बाब आहे. पंचायतराज व्‍यवस्‍थेत महिलांचा सहभाग महत्‍वाचा असल्‍याचे प्रतिपादन राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे केले.

पंचायत समिती सभागृहात राज्‍य महिला आयोग व महिला राजसत्‍ता आंदोलन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने महिला सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत महिला लोकप्रतिनिधीसाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या कारभारणी प्रशिक्षण अभियानाचे उद्घाटन राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा श्रीमती रहाटकर यांच्‍या हस्‍ते झाले. त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी सभापती रामदाम भोर, गटविकास अधिकारी अलका शिरसाठ, महिला राजसत्‍ता आंदोलनाचे प्रमुख दत्‍ता उरमुडे आदी उपस्थित होते.

श्रीमती रहाटकर म्‍हणाल्‍या, पंचायत राज व्‍यवस्‍थेत महिलांचा सहभाग वाढतो आहे. ही कौतुकास्‍पद बाब आहे. पंचायतस्‍तरावरील महिला लोकप्रतिनिधींची गरज लक्षात घेऊन ग्रामीण स्‍तरावरील महिला लोकप्रतिनिधींना राज्‍य महिला आयोगाच्‍या कार्याची ओळख करुन देणे. महिलांसाठी असलेल्‍या कायद्याची आणि सरकारी आदेशाबद्दलची माहिती देणे, ग्रामपंचायत अर्थसंकल्‍प, शासन आदेश, ग्रामपंचायत योजना, पंचायत यंत्रणा, नव कल्‍पना आणि पंचायती राजमधील प्रयोग समजून घेणे या उद्देशाने कारभारणी प्रशिक्षण अभियान राज्‍यातील सर्व जिल्‍ह्यात राबविण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

महिला कुटुंबाचा कणा असतात. त्‍या कुटुंब सक्षमपणे चालवितात त्‍याचप्रमाणे अनेक गावातील महिला सरपंच सक्षमपणे गाव चालवितात. ही अभिमानाची बाब आहे. राज्‍यातील 14 हजार महिला सरपंचांनाही येणाऱ्या कालावधीत प्रशिक्षण देण्‍यात येणार असल्‍याचे सांगताना महिलांना अडचण असेल तिथे महिला सरपंचांची भूमिका महत्‍वाची आहे. त्‍यासाठी प्रशिक्षण निश्चितच उपयुक्‍त ठरेल, असा विश्‍वास श्रीमती रहाटकर यांनी व्‍यक्‍त केला. यावेळी महिला सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत महिला लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा