महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गरजू, सामान्य नागरिकांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध – सदाशिव खोत सोमवार, २० मार्च, २०१७
  • इस्लामपुरात विविध प्रश्नांचा घेतला आढावा
  • अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश
  • पुनर्वसन, प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांबाबत स्वतंत्र आढावा बैठक घेणार

सांगली : जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नागरिकांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज यासह मूलभूत सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी विविध विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करावे व अपूर्ण योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत. गरजूंना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी व सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी कटिबद्ध रहावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.

वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. राजारामबापू नाट्यगृह येथे झालेल्या या आढावा बैठकीत आमदार शिवाजीराव नाईक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, वाळव्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सविता लष्करे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, पुनर्वसित वसाहतीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अपूर्ण कामे, गटारींचा प्रश्न असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. या प्रश्नी एप्रिल महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र आढावा बैठक घेऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करू.

सूक्ष्म वित्तपुरवठा कंपन्यांच्या अवाजवी व्याजदराबाबत स्वयंसहाय्यता बचत गटांनी लेखी तक्रार करावी. ठरलेल्या निकषांना सोडून अधिक व्याजदर आकारले जात असेल, तर ते गैर आहे, असे सांगून राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती यासारख्या या योजनांची माहिती आणि लाभ देऊन गरजू व सामान्य माणसाच्या जीवनात प्रकाशवाटा निर्माण कराव्यात.

भारत नवनिर्माण योजना, राष्ट्रीय पेयजल योजना यासारख्या योजनांची कामे अपूर्ण आहेत. या योजनांमध्ये गैरव्यवहार केलेल्यांची गय केली जाणार नाही. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना पाणी योजनांचे अध्यक्ष व सचिवांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, असे स्पष्ट करून राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा. त्यासाठी विहिरी, कूपनलिका अधिग्रहित कराव्यात, असे निर्देश दिले.

यावेळी पेठ येथे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नावे कृषि महाविद्यालयाला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे अभिनंदन करून आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, पुनर्वसनाचा व पुनर्वसित वसाहतीमधील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पुढील महिन्यात स्वतंत्र बैठक घेऊन, ते सोडवण्याचा प्रयत्न करू. सर्वांना न्याय मिळेल, यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने काम करणे गरजेचे आहे.

आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 1986 सालच्या आहेत. त्यावेळच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांची रचना करण्यात आली होती. त्या सर्व योजनांचा पुर्नअभ्यास करणे गरजेचे आहे. त्यातून मार्ग काढणे आवश्यक असून, याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करावा.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात 14 प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना चालवत आहोत. मात्र, त्याच्या वीजबिलाचा प्रश्न उभा आहे. तो सोडवण्यासाठी नागरिकांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महावितरण, अनधिकृत वाळू उपसा, ऑनलाईन सात बारा मधील अडचणी, तूर खरेदीत बाजार समितीची भूमिका, बसस्थानक, दुष्काळ, वैयक्तिक लाभार्थी योजना, पंजाबराव देशमुख पीक प्रोत्साहन योजना, पुनर्वसन, थकित कृषि पंप जोडणी, थकित पाणीपट्टी, पाणीपुरवठा यासह अनेक विषयांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस जिल्हा स्तरावरील सर्व विभागप्रमुख, तलाठी, ग्रामसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा