महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; प्रशासन सज्ज : नागरिकांनीही दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन शनिवार, ०३ ऑगस्ट, २०१९
पालघर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार 3 आणि 4 ऑगस्ट 2019 रोजी पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 157 मिमी पाऊस झाला आहे. धरणांच्या आणि नद्यांच्या पातळीत देखील वाढ होत असल्याने दुपारी 1 वाजेपासून धामणी आणि कवडास या धरणांमधून 42,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मोठ्या भरतीची शक्यता पाहता किनारपट्टीच्या रहिवाशांना देखील सतर्क करण्यात आले आहे. या परिस्थितीत जिल्हा प्रशासन दक्ष असून नागरिकांनी देखील दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

अतिवृष्टीचा अंदाज लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश संबंधितांना दिले. त्याचबरोबर नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे तसेच वाहत्या पाण्यात न जाण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी 02525-297474 येथे अथवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांच्याशी 9158760756 येथे संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा