महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वनराई बंधारे उभारण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा -निवृत्त ग्रुप कॅप्टन परदेशी यांचे आवाहन बुधवार, १० ऑक्टोंबर, २०१८
श्रमदानाने उभारले बंधारे

सोलापूर :
राज्यातील प्रत्येक गावात वनराई बंधारे उभारण्यात यावेत. वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून पावसाचे पाणी साठवून प्रत्येक गावात शाश्वत जलसिंचनाचा साठा तयार करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवृत्त ग्रुप कॅप्टन प्रतापसिंह परदेशी यांनी आज केले.

उत्तर सोलापुरातील पाथरी येथे आज वनराई बंधाऱ्याची श्रमदानाने उभारणी करण्यात आली. त्यावेळी श्री.परदेशी बोलत होते. अनियमित पावसामुळे शेतीचे व्यवस्थापन करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत शेतीला शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी विकेंद्रीत पद्धतीने जलसाठे होण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारचे वनराई बंधारे विकेंद्रीत साठे तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतील. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाला वनराई बंधाऱ्यामुळे एकप्रकारे पाठिंबाच आहे. पर्यावरण संवर्धनासाठीही वनराई बंधारे उपयुक्त ठरतील, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी जिल्हा परिषद टंचाई परिस्थितीसाठी पुढाकार घेऊन काम करेल. वनराई बंधारे उभारण्यासाठी भर दिला जाईल, असे सांगितले.


कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर यांनी वनराई बंधारे उभारण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, हिरजच्या सरपंच पुर्वा वाघमारे, पाथरीच्या सरपंच अलका बंडगर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, वित्त आणि लेखा अधिकारी महेश अवताडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, नंदकुमार पाटील, सुभाष डोंगरे, नीता चलवादे, अविनाश गोडसे, सचिन जाधव आदी उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा परिषद, राज्य शासनाचा कृषि विभाग, केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण विभाग, आदी विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थांनी यावेळी श्रमदान केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा