महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेतीच्‍या यांत्रिकीकरणाचा नियोजनबद्ध आराखडा कृषि विभागाने तयार करावा - दीपक केसरकर गुरुवार, २० एप्रिल, २०१७
सिंधुदुर्ग : जिल्‍ह्यातील शेतकऱ्‍यांनी उपलब्‍ध पाण्‍याचा शेतीसाठी पुरेपूर वापर करावा, प्रती वर्षी किमान खरीप, रब्‍बी हंगामासह तीन पिके घ्‍यावीत या अनुषंगाने कृषि विभागाने शेतीच्‍या यांत्रिकीकरणाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित जिल्‍हास्‍तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत केल्या.

ये‍थील जिल्‍हा नियोजन समितीच्‍या सभागृहात आयोजित या खरीप हंगाम आढावा जिल्‍हास्‍तरीय बैठकीत जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा रेश्‍मा सावंत, जिल्‍हाधिकारी उदय चौधरी, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अप्‍पर जिल्‍हाधिकारी रविंद्र सावळकर, जिल्‍हा कृषी अधिकारी श्री.म्हात्रे व कृषी विभागाचे अधिकारी तसेच खाते प्रमुख उपस्थित होते.

सुधारित पद्धतीच्या भात जातीच्‍या लागवडीस प्रोत्‍साहन मिळावे यासाठी प्रत्‍येक गावात माहिती देणारे बॅनर्स लावावेत, अशी सूचना करुन पालकमंत्री श्री.केसरकर म्‍हणाले की, कृषि विभागाने जिल्‍ह्यात गावनिहाय किती विहीरी उपलब्‍ध आहेत, किती विहिरीवर पंप आहेत, याची माहिती संकलित करावी, पाण्‍याची साठवण वाढावी, शेतीला पुरेसे पाणी मिळावे यासाठी किती वळण बंधाऱ्‍यांची गरज आहे. तसेच कोल्‍हापूर पद्धतीच्या बंधाऱ्‍यांची किती गरज आहे, याचेही सर्वेक्षण करुन अद्ययावत माहिती संकलीत करावी. उपलब्‍ध पाण्‍याचा पुरेपूर वापर होण्‍याबरोबरच वर्षभरात किमान तीन पिके शेतकऱ्‍यांनी घ्‍यावीत. यासाठी कृषि विभागाने प्रयत्‍नशील रहावे, असे यावेळी पालकमंत्री श्री.केसरकर यांनी स्‍पष्‍ट केले.

जिल्‍हाधिकारी उदय चौधरी यांनी सौर उर्जेवर कृषि पंप जोडण्‍या देण्‍यासाठी महावितरण कंपनीने तीनशे शेतकरी होतील यासाठी प्रयत्‍न करावेत, कृषि विभागाने पंधरा दिवसात शेती यांत्रिकीकरण, पाणीसाठा वाढविण्‍याबाबत सविस्‍तर आराखडा घ्‍यावा. खरीप भात शेतीच्‍या प्रमाणात रब्‍बी हंगामात केवळ ५ टक्‍के भात शेती होते. हे प्रमाण अत्‍यंत व्‍यस्‍त आहे. उन्‍हाळी भात शेतीचे प्रमाण वाढविण्‍यासाठी कृषि विभागाने सर्वेक्षण करावे आदी सूचना यावेळी केल्‍या.

खरीपसाठी ६७ हजार ७५० हेक्‍टर लक्षांक

यंदाच्‍या खरीप हंगामासाठी ६७ हजार ७५० हेक्‍टर क्षेत्राचा लक्षांक निर्धारीत केला आहे. यामध्‍ये भात ६३ हजार हेक्‍टर, नागली २ हजार हेक्‍टर, इतर तृणधान्‍ये २०० हेक्‍टर, कडधान्‍ये २ हजार हेक्‍टर तर तेलबिया ५५० हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. जिल्‍ह्यातील बियाणे वि‍क्रेते १८१ आहेत. खत वि‍क्रेते २४८ यापैकी सहकारी २४८ यापैकी सहकारी संघ व सोसायट्या ११८ आहेत. किटक नाशके विक्रेते १३७ आहेत. खरीप हंगाम २०१७ साठी २२ हजार १७५ मेट्रीक टन खताची मागणी केली आहे. तर ७ हजार ५३१ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. सुधारीत व संकलित भात बियाणे यंदाच्‍या हंगामात ७ हजार ५३१ क्विंटल बियाणे वितरणाचे नियोजन केले आहे. रासायनिक २२ हजार १७५ मेट्रीक टनाची मागणी नोंदविण्‍यात आली आहे, अशी माहिती या बैठकीत देण्‍यात आली.

४३४६ शेतकऱ्‍यांना आंबा नुकसान भरपाई वितरण

जिल्‍ह्यातील ४ हजार ३४६ आंबा उत्‍पादक शेतकरी तर ११७ काजू उत्‍पादक शेतकऱ्‍यांना अनुक्रमे १३५८.११ लक्ष व ९.४० लक्ष नुकसान भरपाई वितरीत केली आहे. हवामानावर आधारीत पथदर्शी फळ पिक विमा योजना अंतर्गत २०१६-१७ मध्‍ये आंबा ५७११ शेतकरी, काजू १२८ तर केळी ११ शेतकरी सहभागी झाले आहेत. या अनुषंगाने आंबा २८८ लक्ष, काजू ४२.९६ लक्ष तर केळी ४६ हजार रुपये विमा हप्‍ता रक्‍कम भरलेली आहे.

२१ एप्रिल २०१७ रोजी संपन्‍न झालेल्‍या खरीप सन २०१६-१७ जिल्‍हास्‍तरीय आढावा सभेतील उपस्‍थि‍त मुद्यांबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही झाली असल्‍याची माहिती या सभेत देण्‍यात आली. यामध्‍ये श्री पद्धतीने भात लागवडीची ८८० हेक्‍टर क्षेत्रावर प्रात्‍यक्षिके गत खरीप हंगामात घेण्‍यात आली तसेच चतुसुत्री ८०० हेक्‍टर व सगुणा भात उत्‍पादन तंत्रज्ञान ८० हेक्‍टर क्षेत्रावर प्रात्‍यक्षिके घेण्‍यात आली. कृषि अभियांत्रिकीकरण उप‍अभियान योजने अंतर्गत ३३१.८८ लक्ष रुपये निधी खर्च झाला. उन्‍हाळी हंगामात जनावरांना हिरवा चारा उपलब्‍ध होण्‍यासाठी एन. बी. २१ या गवताच्‍या वाणाचे ३ हजार ठोबांचे वाटप केले आहे. हिरव्‍या चाऱ्‍यासाठी शंभर टक्‍के अनुदानावर ६१ हजार ५६० किलो बियाणाचे वितरणकरण्‍यात आले. अनामत रक्कम भरलेल्‍या १हजार ८७८ कृषि पंपापैकी ८७१ कृषि पंपाना विज जोडणीचे काम पूर्ण केले. जिल्‍हा स्‍तरापासून विविध विकास कार्यकारी सेवा सोसायट्यांपर्यंत जनजागृती मोहिम राबविण्‍यात आली. त्‍यानुसार २ हजार ८०० ऐवढे नविन सभासद होऊन त्‍यांनी ९८३.२० लक्ष रुपयांच्‍या कर्जाची उचल केली आहे. जलयुक्‍त शिवार कार्यक्रमांतर्गत २०१६-१७ या वर्षाकरीता जिल्‍ह्यातील २३ गावांची निवड करण्‍यात आलेली आहे. ३७४ कामांसाठी १६४६.६९ लाखाचा आराखडा तयार केला असून मार्च २०१७ अखेर ३८ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ३१६.५१ लक्ष रुपये खर्च करण्‍यात आले आहेत.

प्रारंभी अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव शेळके यांनी उपस्थित मान्‍यवरांचे स्‍वागत केले व मागील सभेचे इतिवृत्‍त वाचन केले. सन २०१६-१७ मध्‍ये उत्‍कृष्ट कार्य करणाऱ्‍या कृषि कर्मचाऱ्‍यांचा यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्‍या हस्‍ते प्रश‍स्‍तीपत्र देऊन गौरव करण्‍यात आला. यावेळी बाबली सहदेव गाड, अशोक पारकर, सुधाकर कारवडे, विवेकानंद नाईक व दिगंबर राणे यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा