महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पैठण येथील विकास कामे कालबद्धरित्या पूर्ण करावीत - विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर मंगळवार, १२ जून, २०१८
औरंगाबाद : पैठण हे जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण असून पर्यटन, दळणवळण, मत्स्य उत्पादन, संतपीठ, जायकवाडी प्रकल्प, संत ज्ञानेश्वर उद्यान या सर्व घटकांच्या अनुषंगाने या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधांसह आवश्यक विकास कामे कालबद्धरित्या तत्परतेने पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी येथे दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात पैठण येथे विभागीय आयुक्तांनी दि. 1 जून रोजी केलेल्या पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी विभागीय आयुक्त डॉ.भापकर यांनी संबंधितांना निर्देशित केले. बैठकीस अशोक तेजनकर, प्र. कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, अपर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, शिवानंद टाकसाळे, उपायुक्त वर्षा ठाकूर, अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

पैठण येथे संतपीठाची स्थापना होणे ही जिल्ह्याच्या शैक्षणिक, पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्वाची बाब असून हे संतपीठ लवकरात लवकर सक्रियरित्या सुरू करणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने सांस्कृतिक विभाग, शिक्षण विभाग, विद्यापीठ प्रशासन यांनी तत्परतेने त्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना डॉ.भापकर यांनी दिल्या. तसेच पैठण या ठिकाणी पर्यटकांची पसंती असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या सुशोभिकरण, अद्ययावत सोयी सुविधांच्या पूर्ततेसह हे उद्यान पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेने कृती आराखडा तयार करावा. पावसाळ्यापूर्वी पैठण येथील सर्व लहान मोठ्या नाल्यांची सफाई करून घ्यावी. दळणवळण सुविधेच्या दृष्टीने रस्त्यांची डागडुजी, दुरूस्ती कामे करून घ्यावीत. नाथमंदीर हे पैठण पर्यटन स्थळातील महत्वाचे ठिकाण असून त्याची अंतर्गत परिसर, बाह्य सुरक्षा, स्वच्छता, दुरूस्ती या गोष्टी प्राधान्याने करून घेण्याबाबत डॉ.भापकर यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन, मत्स्यविक्री हा शेतकऱ्यांसाठी खात्रीलायक चांगला आर्थिक स्त्रोत असून त्यादृष्टीने पैठण येथे मत्स्यबीज निर्मितीसाठी आणि पाझर तलाव, शेततळी, जलयुक्तमुळे निर्माण होणारे पाणी साठे, तळी याठिकाणी प्राधान्याने मत्स्य उत्पादन निर्मितीवर भर द्यावा. यासाठी गाव, तालुकास्तरावर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून मत्स्यबीज, मत्स्य उत्पादन प्रमाण वाढवावे, असे डॉ.भापकर यांनी यावेळी सांगितले.

पैठण शहरांतर्गत स्वच्छता, दळणवळण, पाणी, शौचालय बांधणी, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षलागवड मोहीमेसंदर्भातील कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

बैठकीस चारूदत्त बनसोड, कार्यकारी अभियंता, जायकवाडी, जयदिप शितोळे, उपअधीक्षक भूमि अभिलेख, पैठण, भाऊसाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी, पैठण-फुलंब्री, डॉ. अशोक देशमाने, मराठी विभाग प्रमुख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महेश सावंत, तहसिलदार, पैठण, विजय राऊत, तहसिलदार, अतुल चव्हाण, अधिक्षक अभियंता सां. बां. विभाग औरंगाबाद, राजेंद्र नोरकर, सहायक अभियंता, व्ही. के. खांडके, शिक्षण उपसंचालक यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा