महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पिण्याच्या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार याची दक्षता घ्या - पालकमंत्री रविंद्र वायकर सोमवार, १३ मे, २०१९


रत्नागिरी : कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतानाही जिल्ह्यात काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आचारसंहिता कालावधीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पाणी टंचाई व दुष्काळी परिस्थितीचा आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड,अधीक्षक अभियंता रत्नागिरी पाटबंधारे विभाग अजय दाभाडे, महावितरण पी.जी.पेठकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद, डी.एस. परवडी, उपजिल्हाधिकारी रोहयो, संतोष जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कार्यकारी अभियंता, म.जी.प्रा. विभाग,रत्नागिरी अविनाश पांडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये आदि विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी या बैठकीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील पाणी टंचाई व पाणी पुरवठा याबाबत संबधित अधिकाऱ्यांशी तालुकानिहाय चर्चा करुन आढावा घेतला. जिल्ह्यामध्ये पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, आवश्यक असेल तेथे पाणी पुरवठा करा, लोकांना त्रास होणार नाही असे पहा, त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करा, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील धरणांच्या सद्य:स्थितीबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबधितांना यावेळी केल्या. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील ५३ गावे जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती आणि इतर यंत्रणांनी एकत्र काम करुया आणि पुढील वर्षी ही गावे टँकरमुक्त करु, असे उद्दिष्ट सर्वांनी घेऊ या.

ते म्हणाले दापोली येथे माशांसाठी वापरले जाणारे बर्फ गोळ्यावाल्यांनी वापरल्याने दापोली येथील ३७ लोकांना ताप येऊन त्रास झाला. जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे बर्फ पुरवठा करणाऱ्या व वापरणाऱ्यांवर आवश्यक तिथे फौजदारी कारवाई करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच सर्वांनी पाणी गाळून व तापवून प्या, असे आवाहन यावेळी त्यांनी सर्वांना केले.

शेवटच्या आठवड्यात दौऱ्याचे आयोजन

पालकमंत्री या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. यावेळी ते तेथील लोकांशी धरणामुळे आपल्याला किती फायदा झाला, त्यांच्या समस्या जाणून घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

दापोली येथील जनतेचा आदर्श घ्या

दापोली तालुक्यातील नारगोली धरणातील गाळ काढण्याचे काम लोकसहभागातून सुरु आहे. नारगोली धरणातील गाळ काढल्याने तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साठा होऊन पुढील वर्षी दापोली शहरात पाणी समस्या राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सकारात्मक विचार ठेवून लोकसहभातून अशाप्रकारे करण्यात आलेल्या कामाबद्दल येथील जनतेचे त्यांनी अभिनंदन केले आणि त्यांचा आदर्श जिल्ह्यातील इतर सर्वांनी घ्यावा, असे आवाहन केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा