महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गरीबातील गरीब नागरिकाला आयुष्यमान योजनेचा लाभ मिळायला हवा : हंसराज अहीर बुधवार, ०९ जानेवारी, २०१९
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यशाळा




चंद्रपूर : सर्वांसाठी आरोग्य या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली आयुष्यमान भारत ही महत्वाकांक्षी योजना असून गरीबातील गरीब नागरिकाला आयुष्यमान योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे. त्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून सेवा देण्याचे आवाहन आज उपस्थित ग्राम पंचायत व सेतू केंद्रातील कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

यावेळी ‍महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.बी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे, विजय राऊत, राहुल सराफ आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) मार्फत कार्ड वाटप करण्यात आले. आज जिल्ह्यातील १६ लोकांना या योजनेअंतर्गत गोल्ड कार्ड वाटप करण्यात आले. या योजनेचा लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. आयुष्यमान भारत ही योजना आरोग्य संबंधातील विमा योजना असून या अंतर्गत गरीबी रेषेखालील व अन्य सर्व जनतेला ६६१ आजारांसाठी विमा कवच बहाल करण्यात येणार आहे. ५ लाखापर्यंत या योजनेअंतर्गत उपचारासाठी मदत केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये सीएससी सेंटर उभारले जाणार आहे. उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक केंद्रावर सद्या नोंदणी सुरु आहे. सेतू केंद्र व ग्राम पंचायतमधून या संदर्भातील नोंदणी केली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील २ लाख ७४ हजार कुटुंबाना यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. जवळपास १० ते १२ लाख जनतेला याचा फायदा मिळणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात चंद्रपूर आणि नाशिक जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.

आजच्या कार्यक्रमात जिल्हाभरातील आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) तसेच ग्राम पंचायत व सेतू केंद्रातील केंद्र चालक उपस्थित होते. या शिवाय जिल्हा आरोग्य यंत्रणेतील जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. १ जानेवारीपासून चंद्रपूर जिल्हयामध्ये या योजनेचा शुभारंभ झाला आहे.

यावेळी बोलतांना गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आपले सेवा केंद्रामार्फत सुरु असणाऱ्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, भारतासाठीही योजना महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून खासगी आरोग्य यंत्रणा देखील सामान्य लोकांच्या सेवेत येणार आहे. ही योजना राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील बांधवांसाठी उपयोगाची ठरणार आहे. महाराष्ट्रात या योजने सोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजनाही एकत्रित राबविली जाणार आहे.त्यामुळे जवळपास सगळ्या लोकांना आरोग्य विम्याचे कवच मिळणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे भारताच्या या योजनेची जगभरात चर्चा होत आहे. यातून ग्रामीण भारताच्या आरोग्याचा प्रश्न सुटत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या सोबत ही योजना सुरू होत असल्यामुळे महाराष्ट्रासाठी ही योजना अधिक उपयोगी ठरत असल्याचे ते म्हणाले. देशभरात दहा कोटी लोकांना याचा लाभ होणार आहे. आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. त्यामुळे या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी समर्पित होऊन या योजनेचा यशस्वीतेसाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले. समाजातील वंचित घटकाला लक्षात ठेवून या योजनेची रचना करण्यात आली आहे. राज्यात आयुष्यमान भारत योजना सोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजना ही एकत्रित राबवली जाणार आहे. त्यामुळे जवळपास सर्वच लोकांना याचा लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीएससीचे महाराष्ट्र प्रमुख समीर पाटील, प्रकल्प प्रमुख निलेश कुंभारे, जिल्हा प्रबंधक रमजान शेख, अनिरुद्ध डहाके, स्वप्नील सोनटक्के यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे संचालन उद्धव पुरी यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा