महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
स्पर्धा परीक्षेतील यशासाठी लोकराज्यचा उर्दु अंक उपयुक्त- जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
लातूर दि. 12 : राज्य शासनाच्या विविध योजना व ध्येय-धोरणे तसेच स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने महत्वपुर्ण लेख लोकराज्याच्या उर्दु अंकात दिलेले असतात. त्यामुळे लोकराज्य उर्दु हे मासीक संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षेतील यशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपुर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी केले.

लातूर शहरातील डॉ. महंमद इक्बाल उर्दु गर्ल्स हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित उर्दु लोकराज्य वर्गणीदार वाढविण्याबाबतच्या कार्यक्रमात श्री. सोनटक्के मार्गदर्शन करत होते. यावेळी प्राचार्य पठाण शाहीन हारुनखान, शिक्षकवृंद पटेल झुल्फेखार, काझी गफुर, अहेमद रियाज, सुनेदी यास्मीन जहॉ, माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक श्री. नंदु पवार, श्री. कैलास लांडगे, श्री. अयूब पठाण आदिसह मोठया संख्येने विद्यार्थीनी व शिक्षकवृंद उपस्थित होते.

जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के पुढे म्हणाले की, राज्य शासन लोकराज्य उर्दुच्या माध्यामातून उर्दु भाषिक नागरिकांपर्यंत शासनाची ध्येय धोरणे, निर्णय व योजना पोहोचविण्याचे काम करत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उर्दु भाषिक नागरिक, विद्यार्थी, वाचक यांनी लोकराज्य उर्दुचे वार्षिक वर्गणीदार होऊन घरबसल्या सर्व योजनांची माहिती उपलब्ध करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

लोकराज्य उर्दु अंकामध्ये विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती आकडेवारीसह दिलेली असते. तसेच योजनांची अंमलबजावणी कशा पध्दतीने होत असून त्या योजनांचे लाभार्थी कोणते आहेत व योजनांचा लाभ मिळण्यासाठी काय करावे लागेल त्या त्या योजनांच्या यशोगाथा याची संपूर्ण माहिती दिलेली असते, श्री. सोनटक्के यांनी स्पष्ट केले.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकराज्यच्या अंकातील माहिती महत्वपुर्ण असून स्पर्धा परीक्षेतील मार्गदर्शनबाबतचे दिशादर्शक लेख ही वाचनीय व माहितीपूर्ण असतात. त्यामुळे प्रत्येक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या घरी लोकराज्यचा अंक असणे अत्यंत आवश्यक असल्याचे श्री. सोनटक्के यांनी स्पष्ट केले.

मराठी लोकराज्यचा एक अंक 10 रुपये तर वार्षिक वर्गणी 100 रुपये आहे. तर उर्दु लोकराज्यचा एक अंक 5 रुपये व वार्षिक वर्गणी 50 रुपये इतकी असून सर्वसामान्य विद्यार्थी व वाचक हे अंक सहजपणे खरेदी करून संग्रही ठेवू शकतात तरि जास्तीत जास्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासीकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन श्री. सोनटक्के यांनी केले.

प्रारंभी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विद्यार्थी व शिक्षक वृंद यांना लोकराज्यचे उर्दु अंक भेट म्हणून देण्यात आले.

प्रा.शेख यदुल्ला अमीनसाब यांनी प्रास्ताविकात लोकरज्य उर्दु अंकाबाबत विद्यार्थीनीना सविस्तर माहिती देऊन शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ह्या अंकातील माहिती आवश्यक असल्याचे सांगितले. तर एम.एम. जमादार यांनी आभार मानले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा