महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
बँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा - दिवाकर रावते शुक्रवार, २९ जून, २०१८
लातूर : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 15 हजार कोटींची कर्जमाफी दिलेली आहे.लातूर जिल्ह्यात ही 1 लाख 40 हजार 344 लाभार्थ्यांना 380 कोटीची कर्जमाफी मिळालेली आहे. परंतू ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 1 लाख 51 हजार ते 1 लाख 70 हजारांपर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची माहिती घेऊन दीड लाखांपेक्षा अधिकची रक्कम (1 हजार ते 20 हजार रुपये) संबंधित बँकांनी स्वत:हून शेतकऱ्यांना माफ करण्याचा निर्णय वन टाईम सेटलमेंट अंतर्गत घेतल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळून दीड लाखापेक्षा अधिकचे कर्ज असलेले शेतकरीही कर्जमुक्त होतील, असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना कर्जमुक्ती व कर्ज उपलब्धता आढावा बैठकीत परिवहन मंत्री श्री.रावते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर, निवासी उप जिल्हाधिकारी प्रताप काळे, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी शंकर बरुडे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विभागीय व्यवस्थापक आशोक गटाणी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी आदि उपस्थित होते.

परिवहन मंत्री म्हणाले की, वन टाईम सेटलमेंट (ओटीएस) अंतर्गत बँकांनी त्यांच्या अधिकारात शेतकऱ्यांचे दीड लांखांवरील कर्जाची रक्कम माफ केल्यास त्या शेतकऱ्यांना शासनाकडून दीड लाखाची कर्ज माफी मिळेल, त्याकरिता बँकांनी अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्जमाफी योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळवून द्यावा, असे त्यांनी सूचित केले.

शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासनाने या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावाणी करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून दिल्याने ही कर्जमाफी योजना यशस्वी झालेली असल्याचे मत श्री.रावते यांनी व्यक्त करुन लातूर जिल्हा प्रशासनासह मराठवाड्यातील प्रशासनाचे अभिनंदन केले. लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारे असल्याने जिल्ह्यात 380 कोटीची कर्जमाफी 1 लाख 44 हजार शेतकऱ्यांना मिळालेली असून हा एक वेगळा पॅटर्न असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषि विभागाने येणाऱ्या काळात अधिक जागृत राहून शेतकऱ्यांना पीक पद्धतीबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. बदलत्या काळानुसार व बाजारपेठेच्या मागणी नुसार पीक पद्धती राबविली पाहिजे व यातून शेतकऱ्यांची अर्थिक उन्नती व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, असेही श्री.रावते यांनी स्पष्ट केले. कर्जमाफी योजना अंमलबजावणी व पीक कर्ज वाटप सन 2018-19 चे चांगले काम केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे त्यांनी कौतूक केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कार्यवाहीची माहिती दिली. यामध्ये या योजनेसाठी 1 लाख 52 हजार 806 शेतकरी पात्र ठरले असून यातील 1 लाख 40 हजार 344 शेतकऱ्यांना 379 कोटी 60 लाखाची कर्ज माफी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित 12 हजार 462 शेतकऱ्यांना ही या योजनेचा ओटीएस अंतर्गत लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या कर्जमाफी योजनेत जिल्ह्यासाठी 517 कोटी 99 लाखांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यात सन 2018-19 खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट 39 टक्के पूर्ण झालेले असून आतापर्यंत 1 लाख 64 हजार 124 शेतकऱ्यांना 729 काटी 87 लाख 16 हजारांचे पीक कर्ज वाटप झाले असल्याची माहिती जी. श्रीकांत यांनी दिली यावेळी जिल्हा उपनिबंधक जाधव व कृषि अधीक्षक श्री.आळसे यांनी त्यांच्या विभागांशी संबंधित माहिती बैठकीत दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा