महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शिंदखेडा तालुका दुष्काळमुक्त करणे हेच आपले ध्येय : रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८
धुळे : तापी नदीप्रमाणेच बुराई नदी बारमाही करुन शिंदखेडा तालुका दुष्काळ मुक्त करणे हेच आपले ध्येय आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

शिंदखेडा तालुक्यातून वाहणारी बुराई नदी बारमाही प्रवाहित करण्यात येणार आहे. त्यासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून बुराई नदीवर ठिकठिकाणी 24 बंधारे बांधण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री.रावल यांनी बुधवारपासून दुसाणे, ता.साक्री येथून बुराई नदी पायी परिक्रमेस सुरुवात केली आहे. या परिक्रमेचा आज तिसरा दिवस होता. जखाणे, ता. शिंदखेडा येथून परिक्रमेस सुरुवात झाली. आज सकाळी अकराच्या सुमारास परिक्रमेचे अमराळे, ता. शिंदखेडा गावात आगमन झाले. तेथे ग्रामस्थांनी परिक्रमेचे स्वागत केले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री श्री. रावल बोलत होते.

यावेळी दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक राजाभाऊ ढोकळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, तहसीलदार सुदाम महाजन (शिंदखेडा), उपविभागीय कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे, तालुका कृषी अधिकारी सी. डी. साठे उपस्थित होते. यावेळी मोराणे येथील युवक-युवतींनी ‘पाणी वाचवा-पाणी अडवा’ याविषयावर जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.

मंत्री श्री.रावल म्हणाले, काही वर्षांपूर्वी बुराई नदी बारमाही वाहत असे. मात्र, नियोजन व जलपुनर्भरणाअभावी नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे आपल्याला नियोजन करावे लागेल. पावसाचा प्रत्येक थेंब अडवावा लागेल. यापूर्वी तापी नदी बारमाही करण्यासाठी दोंडाईचा ते तोरणमाळ अशी सायकल यात्रा काढली होती. आता तापी नदी दुथडी भरली आहे. तापी नदीवरील उपसा सिंचन योजनेचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या दिवाळीपर्यंत तालुक्यातील सुमारे 25 हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकेल. त्यानंतर आता बुराई नदीवर माथा ते पायथा असे बंधारे बांधण्यात येतील. हे सर्व बंधारे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील. त्यामुळे आगामी पावसाळ्यात या बंधाऱ्यांमध्ये पाणी जमा झालेले दिसेल. तसेच सुलवाडे- जामफळ- कनोली योजनेचे भूमीपूजन लवकरच करण्यात येईल. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या माध्यमातून राज्यात एक लाख 40 हजार विहिरींना मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्ध करावयाचा आहे, असेही मंत्री श्री.रावल यांनी सांगितले.

श्री.ढोकळे यांनी सांगितले, पावसाअभावी परिसराची स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत बुराई नदी परिक्रमेचा उपक्रम स्तुत्य आहे. त्यामुळे परिसरातील चित्र बदलण्यास मदत होईल. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.सांगळे म्हणाले, खरीप हंगाम जवळ येत आहे. त्याची पूर्व तयारी सुरू झाली आहे. गेल्या वर्षी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यामुळे बोंड अळी नियंत्रणासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत प्रगती साधावी. धुळे जिल्ह्यातील 550 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. त्यासाठी 6 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. बाजार समितीचे सभापती श्री.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्य श्री.निकम यांनी सूत्रसंचालन केले.

तत्पूर्वी मंत्री. श्री.रावल यांच्या हस्ते बुराई नदी पात्रात अमराळे गावाजवळ बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच मंत्री श्री. रावल यांच्या बुराई नदी पायी परिक्रमेचे आरावे गावात स्वागत करण्यात आले. तेथे मंत्री श्री. रावल यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थ, विविध विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुराई परिक्रमेत उद्या

मंत्री श्री. रावल हे बुराई नदी पायी परिक्रमेत शनिवार 14 एप्रिल 2018 रोजी सकाळी 7 वाजता चिमठाणे, ता. शिंदखेडा येथून बुराई नदी पायी परिक्रमेस सुरवात करतील. सकाळी 07.30 वाजता चिमठाणे येथे बुराई नदीवरील 2 केटीवेअर बंधाऱ्यांचे भूमीपूजन, सकाळी 08.30 वाजता निशाणे येथे शेतकऱ्यांशी चर्चा, सकाळी 10.15 वाजता महाळपूर येथे गावकऱ्यांशी चर्चा, सकाळी 11.00 वाजता बाभुळदे येथे गावकऱ्यांशी चर्चा, सकाळी 11.45 वाजता दरखेडा येथे आगमन व गावकऱ्यांशी चर्चा, दुपारी 12.10 वाजता दरखेडा येथे केटीवेअरचे भूमीपूजन.

सायंकाळी 05.20 वाजता चिरणे–कदाणे येथे सभा, सायंकाळी 7.00 वाजता परसामळ येथे गावकऱ्यांशी चर्चा, रात्री 08.00 वाजता कुमरेज येथे शेतकऱ्यांशी चर्चा.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा