महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेतकऱ्यांना बँकांनी तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे - सदाभाऊ खोत रविवार, १० जून, २०१८
औरंगाबाद - मराठवाड्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी बँकांनी ठरवून दिलेले उद्दिष्ट वेळेत साध्य करावे आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज तात्काळ उपलब्ध करून द्यावे. पीक कर्जाबाबत जनजागृती घडविण्यासाठी मेळावे आयोजित करावेत, अशा सूचना आज कृषी व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

विभागीय आयुक्त यांच्या दालनात खरीप हंगामाचे नियोजनाबाबत आयोजित बैठकीत श्री. खोत बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, अपर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, मराठवाड्यातील महसूल आणि कृषी विभागाचे, बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. खोत म्हणाले, शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांना लाभ दिला आहे. या योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना यंदा तत्काळ पीक कर्ज द्यावे. त्याचबरोबर बोंड अळीपासून झालेल्या नुकसानीची भरपाई, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मंजूर विमा रक्कम शेतकऱ्यांच्या मूळ खात्यात समाविष्ट करावी. कर्ज खात्यात सदरील रक्कम वर्ग करू नये, अशा सूचनाही बँक अधिकाऱ्यांना यावेळी श्री. खोत यांनी दिल्या.

बोंडअळीवर नियंत्रण आणण्यासाठी ग्रामसभा घेऊन व्यापकप्रमाणात कृषी विभागाने जागृती करावी. गावामध्ये डिजीटल फलकावर शेतकऱ्यांना आवश्यक असणारी बोंडअळी नियंत्रण उपाययोजनांची माहिती लावावी. कृषीशी निगडीत असणाऱ्या कृषी आणि खासगी महाविद्यालयातील शेवटच्या वर्षांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन कृषी सहाय्यकांसोबत जनजागृतीपर कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांमध्ये बोंडअळी निर्मुलनाबाबत जागृती करावी, अशा सूचनाही महसूल आणि कृषी अधिकारी यांना श्री.खोत यांनी केल्या.

शेतकरी पेरणी संवाद हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राज्यभरात उत्सवाप्रमाणे यंदा राबविण्यात येणार आहे. या संवादामध्ये कर्मचारी-अधिकारी बांधावर जाऊन शेतकरी करीत असलेल्या पेरणीमध्ये सहभागी होऊन त्यांच्याशी संवाद साधतील, असा हा स्तुत्य स्वरूपाचा उपक्रम राज्यस्तरावर शासनामार्फत राबविण्यात येतो आहे. या पेरणी संवाद कार्यक्रमात कृषी, महसूलमधील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी हिरीरीने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बाजारातील निकृष्ट दर्जाचे बियाणे, खत शेतकऱ्यांना विक्री करण्यात येऊ नये, याची खबरदारी म्हणून कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी भरारी पथकाच्या माध्यमातून बियाणे, खतांची तपासणी करावी. मान्यता नसलेल्या बियाणे, खतांच्या विक्रीवर आवश्यक ती कारवाई तत्काळ पार पाडावी. शेतकऱ्यांना पेरणी करताना बियाणांची चणचण भासणार नाही, याचीही कृषी विभागाने खबरदारी घ्यावी, असेही यावेळी श्री.खोत यांनी कृषी अधिकाऱ्यांना सांगितले.

शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत मिळण्यासाठी, बँकांना ठरवून दिलेले उद्दिष्ट योग्य रितीने पूर्ण केल्या जात असल्याबाबतचा आढावा सर्व जिल्हाधिकारी यांनी दररोज घ्यावा. तसा दैनंदिन अहवाल विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त आणि कृषी विभागाला पाठविण्याचे निर्देशही श्री. खोत यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.

कृषी आयुक्त श्री. सिंह यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी दिनांक 31 जुलै आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 24 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करावेत. याबाबतही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना दिल्या. ज्याठिकाणी विमा कंपन्यांचे कार्यालय, प्रतिनिधी उपलब्ध नाहीत, अशा कार्यालयाबाबत तत्काळ अहवाल सादर करावा, असेही निर्देशही श्री. सिंह यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले.

विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी चला गावाकडे जाऊ, गाव, ज्ञान आणि महाविद्यालय, वृक्ष लागवड मोहीम, उभारी आदी औरंगाबाद विभागामार्फत कृषी संबंधित राबविण्यात येत असलेल्या स्तुत्य अशा उपक्रमांची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना यावेळी दिली. त्याचबरोबर पर्जन्यमान, मागील वर्षापासून आजपर्यंत झालेला खरीप हंगाम पीक क्षेत्रातील बदल, जिल्हानिहाय, पीकनिहाय पेरणीक्षेत्र, प्रस्तावित पेरणी क्षेत्र, प्रमुख पिकांची उत्पादकता, कापूस बियाणांची मागणी, रासायनिक खतांचे नियोजन आणि वापर, कापूस पिकाखालील शेंदरी बोंड अळी व्यवस्थापन, गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना यासह यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 1214 कोटी 57 लाखांचा मंजूर झालेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत सविस्तर अशा स्वरूपात जिल्हानिहाय माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे श्री. खोत यांना दिली.

बैठकीच्या सुरूवातीला विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे तर जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी कृषी आयुक्त सिंह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा