महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शिक्षण संस्थातील शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने करणार - शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे शनिवार, ०९ जून, २०१८
विवेकानंद संस्थेच्या अडीअडचणी प्राधान्याने सोडविणार - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :
शिक्षण संस्थामधील शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने करुन भरतीसाठी एकही पैसा द्यावा लागणार नाही, अशी व्यवस्था निर्माण केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे बोलताना केली.

श्री स्वामी विवेकानंद संस्थेच्यावतीने शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थांनी संस्थेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे होते. कार्यक्रमास बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील, महापौर शोभाताई बोंद्रे, आमदार अमल महाडिक, कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्या शुभांगी गावडे, डाक विभागाचे प्रवर अधीक्षक आर.डी.पाटील, नामदेवराव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

दर्जेदार आणि गुणवत्ता प्रदान शिक्षणासाठी शासनाने गेल्या तीन वर्षात नव नवे प्रयोग आणि अनेकविध सुधारणा केल्या असल्याचे सांगून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, यामध्ये ॲक्टीव्हीटी बेस लर्निंग, पट संख्या वाढ, नापास विद्यार्थ्यांसाठी कौन्सलिंगद्वारे कौशल्य विकासाचे शिक्षण, फेर परीक्षा, एससीईआरटी व बालभारतीचे एका छताखाली काम, शाळांचे समायोजिकरण, संस्थांना स्वायत्त दर्जा असे अनेकविध प्रयोग करुन शिक्षण क्षेत्राला वेगळी दिशा आणि गती देण्याचा प्रयत्न चालविला आहे.

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालय प्राचार्य भरतीची बंदी उठवली असून आता प्राध्यापकांच्या भरतीची बंदीही लवकरच उठवली जाईल, असे सांगून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा दिला असून विवेकानंद, रयत, शिवाजी अशा शिक्षण संस्थांनी यापुढील काळत अशा पद्धतीने काम करण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळांनी 20 टक्के मार्क देण्याची पध्दती पुढील वर्षापासून बंद केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 34 शाळांपैकी 13 शाळा समायोजित करण्यात आल्या आहेत. ज्या शाळातील पटसंख्या 25 पेक्षा कमी आहे त्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी कोल्हापूरचा पॅटर्न म्हणून एक पथदर्शी प्रकल्प राबविला जाईल, असेही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला शासनाच्यावतीने आवश्यकती मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

विवेकानंद संस्थेच्या अडीअडचणी प्राधान्याने सोडविणार - चंद्रकांत पाटील

संस्थेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील याप्रसंगी बोलताना म्हणाले, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अडीअडचणी आणि समस्या सोडविण्यास शासनस्तरावर प्राधान्य दिले असून संस्थेला राज्य शासनाच्या माध्यमातून भरीव मदत उपलब्ध करुन दिली जाईल. तसेच डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षात संस्थेच्या 393 संस्थामध्ये मुलींसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची सुधारणा करुन ती अद्ययावत केली जातील. यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जाईल. संस्थेने 21 महाविद्यालयांसाठी स्वायत्त विद्यापीठ करण्याबाबत प्रयत्न करावेत, असे आवाहनही केले.

गेल्या 4 वर्षात शासनाने शिक्षण क्षेत्राला अधिक सक्षम करुन दर्जेदार, गुणात्मक आणि संस्कारक्षम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, डॉ.बापूजी साळुंखे यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली. बापूजी साळुंखे यांची विचारधारा जोपासून यापुढील काळात संस्थेची वाटचाल केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

प्रारंभी प्राचार्या शुभांगी गावडे यांनी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी प्रस्ताविक केले. याप्रसंगी बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील, महापौर शोभाताई बोंद्रे, कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, डाक विभागाचे प्रवर अधीक्षक आर.डी.पाटील यांची भाषणे झाली. प्राचार्य डॉ.आर.व्ही. शेजवळ यांनी जन्मशताब्दी वर्षाची भुमिका विषद केली. यावेळी भारतीय डाक विभागाच्यावतीने डॉ.बापूजी साळुंखे यांच्या स्मरनार्थ पोस्‍ट पाकीट काढण्यात आले असून त्यांचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रवर अधीक्षक श्री. पाटील यांनी पाहुण्यांना माय स्टँम्स भेट दिली. कार्यक्रमास शिक्षणाधिकारी किरण लोहार, सुभाष चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा