महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राष्ट्र कार्य करणाऱ्या पवारवाडीकरांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा शुक्रवार, १९ मे, २०१७
सातारा : पवारवाडीकरांनी आपल्या श्रमदानामधून राज्य दुष्काळमुक्त करुन जलयुक्त बनविण्यासाठी अतिशय चांगलं काम केलं आहे. या त्यांच्या राष्ट्र कार्याला, समाज कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारवाडी ग्रामस्थांचे कौतुक केले.

कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथे गामस्थांनी केलेल्या श्रमदानातून विविध जलसंधारणाच्या कामांची पाहणी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आमदार बाळासाहेब पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील आदी उपस्थित होते.

ग्रामस्थांचे अभिनंदन करुन मुख्यमंत्री म्हणाले, अतिशय चांगलं काम पवारवाडी ग्रामस्थांनी केलेले आहे. दुष्काळावर जर मात करायची असेल तर ते श्रमदानातून करण्यात येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. पावसाचा थेंब न् थेंब आपल्या गावचा आपल्या मालकीचा आहे. तो गावातच थांबला पाहिजे आणि मुरला पाहिजे. माथा ते पायथा विविध उपचार करुन आपण पाणी अडवतो त्याबरोबरच मातीही अडविली पाहिजे. या कामामुळे माती थांबते. त्यातून पाणी भूगर्भात जाते आणि गाव जलयुक्त होते. पवारवाडी ग्रामस्थ वॉटर कप स्पर्धेसाठी दावेदार आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी इंधनाबाबतचा 1 लाख 93 हजाराचा धनादेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सरपंच राजेंद्र पवार यांना दिला. यावेळी वन विाभागाच्या वतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

याप्रसंगी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, रहिमतपूरचे नगरसेवक सुनील माने, साताऱ्याचे नगरसेवक धनंजय जांभळे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियान श्रमदानातून केलेली कामे

 • डीप सीसीटी 17 हजार मीटर
 • दगड बांध 2 हजार 700 मीटर
 • वृक्ष लागवड संख्या 903
 • लहान माती बांध संख्या 6
 • सी सी टी 1 हजार 267 मीटर
 • एल बी एस ( अनघड दगड बांध) 135
 • विहीर पुनर्भरण 15
 • ठिबक सिंचन 126 हेक्टर
 • यांत्रिक कामे
 • गाळ काढणे 15 हजार घन मीटर
 • ओढा रुंदीकरण 15 हजार 400 घन मीटर
 • मोठा माती बांध 5
 • नाविन्य उपक्रम
 • जाळी बंधारा 2
 • टायर बंधारा 1
 • शोष खड्डा 190

वन विभागाचे एक्सलंट काम


वन विभागाच्यावतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी वृक्षारोपण केले. गतवर्षी लावण्यात आलेल्या वृक्षारोपणाची पाहणी करुन वन विभागाचे एक्सलंट काम आहे असे गौरवोद्गार काढून उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांचे त्यांनी अभिनंदन केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा