महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
समाधान शिबिराच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याचे कार्य कौतुकास्पद - बबनराव लोणीकर सोमवार, १६ एप्रिल, २०१८
परभणी : समाधान शिबिराच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याने गेल्या दोन महिन्यात केलेले कार्य कौतुकास्पद असून सर्व अधिकारी व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

परभणी येथे 19 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जिल्हास्तरीय समाधान शिबिराच्या पूर्व तयारीचा आढावा श्री.लोणीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार मोहन फड, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

समाधान शिबिराचा उपक्रम जिल्ह्यात जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरापर्यंत राबविण्यात आला. या माध्यमातून जिल्ह्यातील 1 लाख 30 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून अजूनही लाभ देण्याचे काम सुरु आहे. येत्या काही दिवसात यामध्ये भरीव वाढ होणार असल्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे. विविध विभागांनी शिबिरात केलेले काम अभूतपूर्व आणि कौतुकास्पद असल्याचे सांगून श्री.लोणीकर यांनी सर्व विभागांचे अभिनंदन केले. सर्वात जास्त लाभ देणाऱ्या तीन तालुक्यांचा सत्कार मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येईल असे सांगतांना श्री.लोणीकर यांनी सर्व लोकप्रतिनिधींना शिबिराच्या उपक्रमात सहभागी करुन घेण्यात आले आहे. 19 एप्रिलच्या कार्यक्रमासाठी सर्व लोकप्रतिनिधींना सन्मानाने निमंत्रित करण्यात येत असून जिल्ह्याच्या विकासाचे मोठे काम यानिमित्ताने होणार असल्याचेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने समारोप समारंभाला उपस्थित राहतील यासाठी सर्व लाभार्थ्यांना आवाहन करण्यात यावे, असे सुचित करुन श्री.लोणीकर यांनी शासकीय यंत्रणेने कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. लाभार्थी स्वयंस्फुर्तीने येतील, असे पहावे अशी सुचना केली. या समारंभासाठी जालना जिल्ह्यातूनही अनेक लाभार्थी 100 एसटी बसेसने येणार आहेत. सर्वसामान्य गरीब जनतेचे समाधान करण्याचे धोरण या शिबिराच्या निमित्ताने राबविण्यात आले. या शिबिराबाबत कोणत्याही शंका निर्माण होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. यावेळी बैठकीत विभागनिहाय व योजनानिहाय कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन श्री.लोणीकर यांनी उपयुक्त सुचना केल्या.

यावेळी श्री.लोणीकर यांनी पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांच्या तक्रारींविषयी प्रशासनाकडून माहिती घेतली कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन जिल्हाधिकारी यांनी तोडगा काढावा अशी सुचनाही त्यांनी केली. बैठकीस पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा