महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मोठ्या रकमेच्या व्यवहारावर आयोगाचे लक्ष राहणार - विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९


पुणे :
विधानसभा निवडणुकीत मोठ्या रकमेच्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणुकीशी निगडीत अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला, यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त मितेश घट्टे, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त प्रताप जाधव आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीच्या काळात मोठ्या रकमेच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्याची आवश्यक आहे. त्यासाठी बँक अधिकारी यांची मदत घ्यावी. रकमेची बेकायदेशीरपणे वाहतूक होऊ नये यासाठी वाहनांची तपासणी करावी. वाहनांच्या तपासणीत बेकायदेशीर रक्कम आढळल्यास काय कार्यवाही करावी याबाबतच्या सूचना भरारी पथकातील अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात याव्यात. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. बेकायदेशीर रक्कम आढळल्यास त्याबाबतची माहिती प्राप्तिकर विभागास देण्यात यावी.

टपाली मतदान प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी नियोजन करा, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे होण्यासाठी मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्याबरोबरच अन्य आवश्यक सुविधा द्या. निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करा. तसेच निवडणूक आयोगाला आवश्यक असणारी माहिती वेळेत आणि अचूक सादर करा, असे सांगून डॉ. म्हैसेकर यांनी विविध जिल्ह्यातील निवडणूक विषयक प्रलंबित गुन्हयाची माहिती घेतली. याबाबत आवश्यक कार्यवाही केली जावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

बैठकीत जिल्हाधिकारी नवल किशोर राम, डॉ. राजेंद्र भोसले, दौलत देसाई, श्वेता सिंघल तसेच पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त यांनी आपल्या जिल्ह्याची माहिती दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा