महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात आजही आयुर्वेदाला विशेष महत्त्व- नितीन गडकरी रविवार, ०४ नोव्हेंबर, २०१८
हेल्थ रनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
9 हजार आयुर्वेद प्रेमींचा सहभाग

नागपूर :
आयुर्वेद ही चिकित्सा पद्धती प्राचीन काळापासून देशात अस्तित्वात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही आयुर्वेदाचे महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळे आजही अनेक आजारावर आयुर्वेदीक उपचार फायदेशीर ठरले आहे. त्यामुळे आयुर्वेदीक चिकित्सा पद्धतीला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकजण रन फॉर आयुर्वेदसाठी ‘हेल्थ रन मध्ये सहभागी झाले. ही बाब अत्यंत कौतुकास्पद असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

आयुष मंत्रालय यांच्या मार्गदर्शनात कस्तुरचंद पार्क येथे तिसऱ्या आयुर्वेद दिनानिमित्त रिजनल आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर मदर एन्ड चाईल्ड हेल्थ तथा नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्थ रनचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महापौर श्रीमती नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलींद माने, विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानचे अध्यक्ष विश्राम जामदार, विशेष पोलीस महानिदेशक के. एम. प्रसन्न, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, प्रभारी महानगरपालिका आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त राम जोशी, स्पोर्ट एजन्सीचे अध्यक्ष नागेश सहारे, आरोग्य भारतीचे सदस्य रमेश गौतम, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रवीकुमार, रिजनल आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर मदर एन्ड चाईल्ड हेल्थचे व्यवस्थापक प्रा. के. एम. दिवान, संशोधन अधिकारी डॉ. आर. गोविंद रेड्डी, डॉ. सविता शर्मा आदी उपस्थित होते.

श्री. गडकरी म्हणाले, आयुष मंत्रालयाच्या वतीने 5 नोव्हेंबर हा दिवस आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वैज्ञानिक युगात आयुर्वेदाच्या तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेक असाध्य रोगांवर उपचार करण्यासाठी या पद्धतीचा आजही वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येकजण आयुर्वेदाचे महत्त्व समजायला लागला आहे. त्याची जनजागृती करण्यास पुढाकार घेत आहे. याचा खरच आनंद होत आहे. हेल्थ रनच्या माध्यमातून आयुर्वेदाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. आयोजकांच्या या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी श्रीमती जिचकार, डॉ. महात्मे यांनी हेल्थ रनला हिरवी झेंडी दाखविली. आयुर्वेद दिनाच्या पूर्व संध्येला आयोजित हेल्थ रनमध्ये अबालवृद्धांनी सहभाग घेतला. हेल्थ रनमध्ये नोंदणी करणाऱ्या 5 हजार 586 धावपटूंसह एकूण विविध वयोगटातील 9 हजार धावपटूंनी यात सहभाग घेऊन आयुर्वेदाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सहभागी धावपटूंना शुभेच्छा दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा