महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राज्य व देशपातळीवर नावलौकिक मिळवलेल्या जिल्ह्यातील कलावंतांचा गुणगौरव करणार- पालकमंत्री गुरुवार, १७ मे, २०१८
जालना महोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवा

जालना :
शहरामध्ये 18 ते 22 मे दरम्यान जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव यशस्वीरित्या तसेच सुरळीतपणे पार पाडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलीस प्रशासनास दिले.

जालना महोत्सव 2018 च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते.

यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, जालना शहरात आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवामध्ये अनेक सिनेकलाकार तसेच राज्यातील महत्त्वाचे व्यक्ती कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावापासून मुक्तता मिळावी व जिल्ह्यातील कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा हा या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू आहे. जालना महोत्सवामध्ये स्थानिक कलावंताना एक हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. या माध्यमातून त्यांना आपली कला सादर करता येणार आहे.

जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून जिल्ह्याचा देशपातळीवर नावलौकिक केला आहे. देशपातळीवरील अनेक पुरस्कार या कलावंतांनी पटकावलेले आहेत. अशा कलाकारांची कला जिल्हावासियांना या महोत्सवाच्या माध्यमातून पाहता येणार आहे. तसेच या कलाकारांचा गुणगौरवही या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. केवळ कलाकारच नाही तर प्रशासनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांही या महोत्सवामध्ये सत्कार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. लोणीकर यांनी सांगितले.

राज्यमंत्री श्री. खोतकर म्हणाले की, मागील अनेक वर्षाच्या नंतर जालना शहरामध्ये अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून जिल्हावासियांसाठी ही एक मेजवानी ठरणार आहे. महोत्सवादरम्यान स्वच्छतेची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाने चोखपणे पार पाडण्याबरोबरच अखंडित वीजपुरवठा राहण्यासाठी विद्युत विभागाने योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच महोत्सवाच्या ठिकाणी नागरिकांना सहजपणे पोहोचता यावे यासाठी एस.टी.महामंडळाने बसेसची सोय करण्याची सुचनाही त्यांनी केली. बैठकीस जालना महोत्सव 2018 समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा