महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विकास कामांचा निधी शंभर टक्के खर्च करावा - दीपक केसरकर गुरुवार, ११ ऑक्टोंबर, २०१८
पोलीस स्टेशन व घरांचे दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपये

सिंधुदुर्ग :
जिल्हा नियोजन समिती मार्फत उपलब्ध निधी शंभर टक्के खर्च होईल, तसेच सर्व विकास कामे दर्जेदार होईल याची दक्षता संबंधित सर्व यंत्रणांच्या अधिकारी वर्गाने घ्यावी, पोलीस कर्मचारी वर्गाच्या वसाहती तसेच जिल्ह्यातील पोलिसांची आऊट पोस्ट, पोलीस स्थानकांच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतूद केली असल्याची माहिती पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीस खासदार नारायण राणे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक,आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, समितीचे अशासकीय व निमंत्रीत सदस्य तसेच जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

२९ कोटी रुपये खर्च

सर्वसाधारण योजनेखाली आतापर्यंत १३१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यापैकी २९ कोटी रुपये खर्च झाला असल्याचे सांगून पालकमंत्री श्री.केसरकर यांनी बी.एस.एन.एल.चे मंजूर नवीन टॉवर लवकरात लवकर सरु करण्याची सूचना केली. धनगर वाड्यांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागाने त्वरीत प्रस्ताव पाठवावेत, वन विभागाच्या अडचणीमुळे वीज जोडणी देता येत नाही अशा धनगर वस्त्यांना सौर उर्जेवरील जोडण्याचे प्रस्ताव द्यावेत. वन विभागाच्या अडचणीमुळे वीज लाईन टाकण्याची अडचण असेल त्या ठिकाणी वन विभागाने पाऊलवाटेवरुन वीज लाईन टाकण्याची परवानगी देण्याबाबत विचार करावा, तिलारी, तेरवण-मेढे धरणाचे खालील बाजूस गार्डन करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा आदी सूचना करुन पालकमंत्री म्हणाले की, कोळंब पुलाचे काम सुरू झाले आहे. यासाठी पर्यायी रस्त्यासाठी चाळीस लाख रुपयांची तरतूद केली असून सदर काम तात्काळ सुरू होईल.

या बैठकीत उपस्थित अशासकीय सदस्यांनी विविध मागण्या मांडल्या. कोकण कृषि विद्यापीठाने प्रस्तावित केलेली बांबू लागवडीची योजना जिल्ह्यात कार्यान्वित व्हावी, साकवांचे ऐवजी वाहतूक होणारे साकव बांधावेत, जिल्ह्यात कोल्हापूरी बंधारे व्हावेत, मध्यम – लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या सर्वेक्षणासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद व्हावी, ७/१२ उताऱ्यांचे संगणकीकरण कामामुळे तलाठी उपलब्ध होत नाहीत ते त्यांचे गावी उपलब्ध व्हावेत, ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांवरील लाईटचे बील शासनाकडून मिळावे, जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने राबविलेल्या योजनेत कडकनाथ, गिरीराज जातीच्या कोंबड्यांना जिल्ह्यात मागणी नाही. या ऐवजी स्थानिक जातीच्या कोंबड्यांचा पुरवठा व्हावा आदी मागण्या यावेळी मांडल्या.

प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी इतिवृत्त वाचन केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा