महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
उद्योजकांनो, स्थानिकांनाच रोजगारात प्राधान्य द्या - उद्योगमंत्री सुभाष देसाई बुधवार, ०९ जानेवारी, २०१९

हिंगणा एमआयडीसीमध्ये कचऱ्याचा प्रश्न तात्काळ सोडविणार

नागपूर : औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी स्थानिकांनाच रोजगार देण्याला प्राधान्य असल्याचे धोरण असून त्यानुसार अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. या धोरणाची कठोरपणे अंमलबजावणी करणे अपेक्षित असून जे उद्योग अंमलबजावणी करणार नाही, असे उद्योग सवलतीपासून वंचित राहतील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

हॉटेल सेंटर पॉइंट येथे लघु व मध्यम उद्योगांवर आयोजित परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. सारस्वत बँक व लोकसत्ता वृत्त समूहाच्या वतीने एसएमई कॉनक्लेव परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई शेअर बाजारचे लघु व मध्यम उद्योग विभाग प्रमुख अजय ठाकूर, उद्योग सहसंचालक अशोक धर्माधिकारी  उपस्थित होते.

उद्योगांच्या विकासासाठी तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग सुरु व्हावेत, यासाठी उद्योग विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दल बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, औद्योगिक परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उद्योजकांच्या सहकार्याने तेवीस प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. परंतु त्यांचे व्यवस्थापन चांगल्या पद्धीतीने व्हावे, यासाठी व्यावसायिक व तज्ज्ञ संस्थांनाच जबाबदारी देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रातील जमीन, हवा आणि पाणी शुद्ध ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच असून उद्योजकांनीही सहकार्य करावे. हिंगणा औद्योगिक परिसरातील निर्माण झालेल्या कचऱ्याचे ढीग तात्काळ हटविण्यात येतील. परंतु यापुढे संपूर्ण परिसर स्वच्छ राहील, याची जबाबदारी उद्योजकांनी  घ्यावी. असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

बुटीबोरी येथील सीईपीटी पाथ दहा क्षमतेपर्यंत वाढविण्यात येणार आहे. तसेच हिंगणा येथील प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयाच्या खर्चाला मान्यता देण्यात आली असून उद्योजकांनी 25 टक्के सहभाग द्यावा. शासनातर्फे हा प्रकल्प तात्काळ पूर्ण करण्यात येईल. अशी ग्वाही देताना औद्योगिक क्षेत्रात आवश्यकतेनुसार तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. यासाठी  कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये अत्याधुनिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जागेसह आवश्यक पायाभूत सुविधा व यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्याचे धोरण आहे. उद्योजकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आयटी क्षेत्रात साडेपाच लाख लोकांना रोजगार

औद्योगिक क्षेत्रातील नवीन उद्योगांची उभारणी तसेच थेट परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्रसारखे उपक्रम राबविण्यात आले असून महाराष्ट्रात देशात अग्रेसर असल्याचे सांगताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, गुंतवणुकीसंदर्भात झालेल्या सामंजस्य करारानुसार इतर राज्यात केवळ 15 ते 20 टक्के प्रत्यक्ष गुंतवणूक होते. परंतू राज्यात 84 टक्के गुंतवणूक झाली असून राज्याच्या विविध भागात विविध नामांकित उद्योगांनी प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. राज्यात 6 लक्ष 50 हजार कोटींची विदेशी गुंतवणूक मागील चार वर्षांत झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याच्या माहिती  तंत्रज्ञान धोरणात केलेल्या आमूलाग्र बदलामुळे 119 खाजगी आयटी पार्क सुरु झाले असून यामध्ये 19 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असून साडेपाच लाख लोकांना नवीन रोजगार मिळाला असल्याचेही उद्योगमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

किरकोळ व्यापार धोरणामध्ये 160 वेगवेगळ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली असून नवीन औद्योगिक क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक झोन तयार करण्याच्या धोरणानुसार नागपूर येथील औद्योगिक क्षेत्रातही इलेक्ट्रॉनिक झोनला मंजुरी देण्यात आली आहे. लघु व मध्यम उद्योगांनी  मुंबई शेअर बाजारामध्ये लघु व मध्यम उद्योगासाठी स्वतंत्र नोंदणी सुरु केली असून राज्यातील लघु उद्योजकांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले. उद्योग आधारावर साडेपाच लाख उद्योगांनी नोंदणी केली असून सर्व उद्योजकांनी आपल्या उद्योगासंबंधी नोंदणी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी  लघु उद्योगांच्या निर्यात परिषदेची स्थापना करण्यात येईल. त्यामुळे जागतिक दर्जाचे उत्पादन तसेच निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. लघु उद्योगांच्या विकासाला प्रोत्साहन देणारे राज्याच्या औद्योगिक धोरणामध्ये समावेश करण्यात येईल. तसेच शेअर बाजारातून निधी उभारताना शासन आपली सुद्धा भागीदारी देईल. त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये विश्वास वाढून राज्यातील लघु उद्योग अधिक सक्षम होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रारंभी उद्योग सहसंचालक अशोक धर्माधिकारी यांनी उद्योग विभागाच्या विविध योजना तसेच उद्योजकांच्या सुविधेसाठी सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मुंबई शेअर बाजारचे लघु व मध्यम उद्योग विभाग प्रमुख अजय ठाकूर यांनी एसएमईसाठी सुरु केलेल्या स्वतंत्र विभागाबद्दल माहिती दिली.

यावेळी बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रिज असोसिएशन एमआयडीसी हिंगण्याचे अध्यक्ष कॅप्टन सी. एन. रणधीर, विदर्भ  इंडस्ट्रिज असोसिएशन अध्यक्ष अतुल पांडे, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया इंडस्ट्रिजचे विदर्भ प्रमुख राहुल दीक्षित, दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष निश्चय शेळके आणि विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष देवेंद्र पारेख आदींनी आपले प्रश्न मांडले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा