महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
चांदा ते बांदा योजनेखालील निधी विहीत कालमर्यादेत खर्च करावा – पालकमंत्री दीपक केसरकर शनिवार, ०७ जुलै, २०१८
सिंधुदुर्ग : चांदा ते बांदा अंतर्गत नैसर्गिक साधन संपत्तीतून आर्थिक विकासाचे सूत्र निश्चित केले आहे. नियमित शासकीय निधी शिवाय या महत्वाकांक्षी योजनेद्वारे सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा पुरेपूर वापर होऊन आर्थिक संपन्नते बरोबरच रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार आहे. चांदा ते बांदा योजनेतील सर्व निधीचा वापर सुयोग्य रितीने व्हावा यासाठी अधिकारी वर्गाने दक्षता घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुडाळ विश्रामगृहावर आयोजित चांदा ते बांदा योजनेच्या आढावा बैठकीत केली.

या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जगताप, उप वनसंरक्षक समाधान चव्हाण अधीक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव शेळके, नियोजन अधिकारी श्री.धनवडे, लेखा अधिकारी विकास पाटील, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एन.ए.सोनवणे, मत्स्यविभाग अधिकीरी श्री.महाडिक आदी उपस्थित होते.

भाताच्या श्री पद्धत लागवडीखाली जिल्ह्यात 900 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड यशस्वी पूर्ण झाली आहे. चांदा ते बांदा योजनेतून लागवडीसाठी योजना प्रस्तावित करावी, कृषि सखी, पशू सखी, मत्स्य सखी यांच्या निवडीची प्रक्रिया येत्या पंधरा दिवसात पूर्ण करावी, तिलारी पाटबंधारे अंतर्गत वन औषधी तसेच करवंद, जांभूळ, रानकेळी, फणस वगैरे लागवडी संदर्भात प्रस्ताव त्वरीत तयार करावा, चांदा ते बांदा अंतर्गत विविध विभागाच्या योजना अंतर्गत अर्ज मागविण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी, खादी ग्रामोद्योग विभागाने निरापासून साखर निर्मिती बाबत प्रशिक्षणाची कार्यवाही त्वरीत पूर्ण करावी, निरा पासून तयार होणाऱ्या साखरेच्या मार्केटिंगबाबत संबंधित संस्थेशी चर्चा करावी आदी सूचना पालकमंत्री श्री.केसरकर यांनी या बैठकीत केल्या.

महिला व बाल रुग्णालय 3 महिन्यात सुरू होणार

कुडाळ येथील तहसिल कार्यालयाच्या समोर नव्याने बांधण्यात येत असलेल्या महिला व बाल रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज केली. 100 खाटांच्या या रुग्णालयास 14 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रुग्णालयात महिला प्रसुती विभाग, लहान बालकांचा अतिदक्षता विभाग, स्वतंत्र प्रयोगशाळा, रक्त पेढी, सोनोग्राफी मशिन, बाल रुग्ण कक्ष असे विभाग असून एकूण 97 पदांसह हे रुग्णालय जिल्हा महिला व बाल रुग्णालय अद्ययावत होणार आहे.

पालकमंत्री श्री.केसरकर यांनी सर्व विभागांची पाहणी करुन येत्या तीन महिन्यात हे रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी कुडाळ शहरात नव्याने होत असलेल्या मैदानाचीही त्यांनी पाहणी केली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर, डॉ.श्रीपाद पाटील, उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी, पंचायत समिती सभापती राजन जाधव, जि.प. सदस्य संजय पडते, डॉ. प्रमोद वालावलकर आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा