महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
साहित्यात वर्तमानाचे भान असावे - वसंत डहाके शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०१५
वर्धा : साहित्याचे उद्दिष्ट मनोरंजन बरोबरच सद्गुणाचे संस्कार समाजात रूजविणे आहे. यासाठी वर्तमानाचे भान त्यात असावे, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी काढले.

स्वाध्याय मंदिर येथे तीन दिवसीय ग्रंथोत्सव व सांस्कृतिक महोत्सव 2015 च्या उद्घाटन प्रसंगी श्री. डहाके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. पंकज भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मिलींद भेंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, जिल्हा ग्रंथपाल अस्मिता मंडपे, प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे प्रदीप दाते, विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, डॉ. शिरीष गोडे, नागपूर येथील प्रा. राजा आकाश उपस्थित होते.

श्री. डहाके म्हणाले, साहित्य हेच समाजाला आत्म भान, समाज भान, राजकीय भान मिळून देण्यासाठी उपयोगी आहे. कोणतेही साहित्य हे उपयोगीच असते, त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यायलाच हवा. आजच्या लेखकांवर काळाप्रमाणे लेखन वाचकांना आवडेल, रूचेल आणि पटेल अशी देण्याची जबाबदारी आहे. साने गुरूजी, ना.सि. फडके, वि.स. खांडेकर, चेतन भगत आणि पाऊलो कोहेलो हे लेखक लोकप्रिय आहेत. त्यांचे साहित्य सर्वांनी वाचायला हवे. सध्या राज्यातही प्रवीण बांदेकर, जयंत पवार, आसाराम लोमटे, किरण गुरव, सदानंद देशमुख आणि अशोक पवार यांचे साहित्य समाजाला भान देण्याचे कार्य करताना दिसताहेत.

डॉ. भोयर यांनी ग्रंथोत्सवाचा सर्व ग्रंथप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना यांनी वसंत आबाजी डहाके यांचा आदर्श सर्वांनी घेऊन साहित्य चळवळ पुढे न्यावी, असे सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनीही यावेळी ग्रंथ वाचण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन वाचन चळवळ समृद्ध करावी, असे आवाहन केले.

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा ग्रंथालय आणि यशवंतराव दाते स्मृती संस्था, विदर्भ साहित्य संघ, वर्धा व ग्रंथोत्सव आयोजन समितीच्या वतीने स्वाध्याय मंदिर येथे तीन दिवसीय ग्रंथोत्सव व सांस्कृतिक महोत्सव 2015 चे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल गडेकर यांनी तर सूत्रसंचालन ज्योती भगत यांनी केले. आभार संजय डोर्लीकर यांनी मानले.

तीन ग्रंथांचे प्रकाशन

वर्धा येथील दिलीप गायकवाड यांच्या ‘गावसय’, प्रभाकर पाटील यांचा ‘माय माऊली’ कथासंग्रह तर देवळी येथील तहसीलदार जितेंद्र कुँवर यांच्या ‘चाफ्याचे फूल’ या पुस्तकांचे प्रकाशनही ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले.

ग्रंथदिंडीने शहरात नवचैतन्य

न्यू इंग्लिश शाळेच्या प्रांगणातून ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सव व सांस्कृतिक महोत्सवाची सुरूवात झाली. सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीमध्ये पारंपरिक वेशात शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच, राजमाता जिजाऊ, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदी महामानवांच्या वेशभूषेतही विद्यार्थी वर्धेकरांचे लक्ष वेधून घेत होते. लेझीम, बँड पथकाने शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले.

ग्रंथदिंडीचे पूजन शाळेच्या परिसरात माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, प्राचार्य गिरीश व्यास, विज्ञान पर्यवेक्षक उषा तळवेलकर, राजेंद्र मुंढे, मुरलीधर बेलखोडे, रंजना दाते, डॉ. स्मिता वानखेडे यांच्या उपस्थितीत पार पडले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा