महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्रात ५ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र- डॉ. ज्ञानेश्वर मुळे गुरुवार, १७ मे, २०१८
नवी दिल्ली : महाराष्ट्रात अमरावती, अकोला, चंद्रपूर, बारामती आणि माढा येथे नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली.

देशात दर ५० कि.मी. अंतरावर पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे उद्दिष्ट असून या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याची आज घोषणा केली आहे. या टप्प्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या जिल्ह्यांच्या ठिकाणांसह पुणे जिल्ह्यातील बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा या तालुक्यांच्या ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह देशातील १४ राज्यांमध्ये ३८ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यास आज मंजुरी देण्यात आल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र परिक्षेत्रात १३ नवे पासपोर्ट सेवा केंद्र
देशातील नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी २०१७ मध्ये देशभरात २५१ पासपोर्ट केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाच्या पहिल्या दोन टप्प्यांतर्गत आतापर्यंत देशभरात १९२ तर महाराष्ट्र परिक्षेत्रात १३ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.

ही आहेत १३ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र
या कार्यक्रमांतर्गत पहिल्या दोन टप्प्यात महाराष्ट्रात आतापर्यंत वर्धा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, सांगली, कोल्हापूर, सातारा, घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड तसेच महाराष्ट्र परिक्षेत्रातील सिल्वासा व दमन-दिव याठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात आली आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या दोन टप्प्यात महाराष्ट्र परिक्षेत्रात २० पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार असून यातील १३ सेवा केंद्र सुरु झाली असून उर्वरित ७ पासपोर्ट सेवा केंद्र लवकरच उघडण्यात येतील. तसेच तिसऱ्या टप्प्यात नव्याने समावेश करण्यात आलेली ५ पासपोर्ट सेवा केंद्रही सुरु होणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा