महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
बाभुळगाव जिल्ह्यातील पहिला हागणदारीमुक्त तालुका बुधवार, १७ मे, २०१७
सात नगरपालिका हागणदारीमुक्त
294 ग्रामपंचायतीही संपूर्ण स्वच्छ

यवतमाळ :
शासनाने संपूर्ण हागणदारीमुक्त संकल्प केला असून त्यासाठी शहरी भागात व ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शंभर टक्के कुटुंबांकडे शौचालय बांधण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. यात बाभुळगाव तालुक्याने शंभर टक्के काम केले असून हा तालुका जिल्ह्यातील पहिला हागणदारीमुक्त तालुका ठरला आहे.

उघड्यावर शौचास बसल्याने विविध प्रकारचे आजार पसरतात. ही एक आरोग्यविषयक समस्या आहे. ही कायमस्वरूपी नष्ट करून संपूर्ण स्वच्छतेकडे वाटचाल करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन ही योजना राबविली जात असून योजनेंतर्गत यावर्षी शंभर टक्के कुटुंबांकडे शौचालय बाधून शहरे, गावे हागणदारीमुक्त करावयाचे आहे. या राष्ट्रीय कामात बाभुळगाव तहसीलने उल्लेखनीय काम केले असून तालुक्यात असलेल्या 63 ग्रामपंचायतीमधील प्रत्येक घरात शौचालयाचे काम पूर्ण झाल्याने हा तालुका जिल्ह्यातील पहिला हागणदारीमुक्त तालुका ठरला आहे.

जिल्ह्यात 10 नगरपरिषदा असून त्यापैकी 7 नगरपरिषदाही हागणदारीमुक्त घोषित झाले आहे. त्यात दारव्हा, पांढरकवडा, पुसद, उमरखेड, दिग्रस, नेर व आर्णी तालुक्याचा समावेश आहे. या नगरपरिषदांनी त्यांना शौचालय बांधकामासाठी असलेले उद्दिष्ट पूर्ण करून शंभर टक्के कुटुंबांकडे शौचालय बांधकाम झाल्याने हागणदारीमुक्त नगरपरिषदेचा मान पटकाविला आहे.

शौचालय बांधकामाची मोहिम मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात राबविली जात आहे. त्यामुळे मे अखेर उर्वरित नगरपरिषदा व पंचायत समित्याही हागणदारीमुक्तीचा पल्ला गाठण्याच्या तयारीत आहे. अनेक ग्रामपंचायतीसुध्दा हागणदारीमुक्त झाले असून 294 गावांनी अशा मान पटकाविला आहे. सर्वाधिक 63 ग्रामपंचायती बाभुळगाव तालुक्यात हागणदारीमुक्त झाल्या आहे. आर्णी तालुक्यात 15 ग्रामपंचायती, दारव्हा तालुका 22 ग्रामपंचायती, दिग्रस तालुका 11, घाटंजी तालुका 7, कळंब तालुका 23 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाले आहे.

केळापूर तालुक्यातील 9, महागाव तालुक्यातील 13, मारेगाव तालुका 18, नेर तालुका 11, पुसद तालुका 13, राळेगाव तालुका 22, उमरखेड तालुका 19, वणी तालुका 25 तर यवतमाळ तालुक्यातील 20 व झरी तालुक्यातील 3 ग्रामपंचायती अशा जिल्ह्यातील 294 ग्रामपंचयती पूर्णपणे हागणदारीमुक्त झाल्या आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा