महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्हा परिषदेच्या शाळा पालिकेकडे वर्ग करणार शनिवार, ०९ फेब्रुवारी, २०१९
 

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेकडे वर्ग करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खासगीकरणाचा पर्याय अवलंबण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापिालकेचे आयुक्त अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

सोलापूर शहराची हद्द वाढ झाल्यामूळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेच्या हद्दीत आल्या आहेत. या शाळा चालविण्यासाठी महानगरपालिकेला द्याव्यात. त्यामुळे महानगरपालिका शाळांच्या विकासासाठी  खर्च करु शकेल, असे मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. यावर शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी कार्यवाही करावी, असे श्री.परदेशी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना लवकरात लवकर दुष्काळी मदत दिली जावी अशा सूचना श्री.परदेशी यांनी दिल्या. एकूण 952 गावांत दुष्काळ असून 4.59 लाख शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. मदतीसाठी 477 कोटी रुपयांची मागणी केली असून 197 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 97 कोटी रुपये प्राप्त झाले असून 2.56 लाख शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली. शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीबरोबरच किसान सन्मान योजनेच्या मदतीचा लाभ देण्यासाठी  माहिती संकलन केले जावे. अशा सूचना श्री.परदेशी यांनी दिल्या. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी चारा नियोजन करावे आणि बंद पाणी पुरवठा योजना सुरु कराव्यात, अशा सूचनाही श्री.परदेशी यांनी दिल्या.

बैठकीत महामार्गाच्या कामासाठी आवश्यक असणारे भूसंपादन, प्रधानमंत्री आवास योजना, मंद्रुप तहसिलदार कार्यालयाची उभारणी, हिप्परगा तलाव विकास, वडापूर बॅरेज आदीबाबतही चर्चा झाली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपवनसंरक्षक पी.के. बडगे, कार्यकारी अभियंता विलास मोरे, राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, दीपक शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक सुमेध  अंदूरकर, जलसंपदा विभागाचे जयंत शिंदे, धीरज साळे, बाबुराव बिराजदार, एन. व्ही. जोशी आदी अधिकारी उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा