महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विकास कामांना गती द्या- पालकमंत्री बबनराव लोणीकर सोमवार, १४ मे, २०१८
जालना : राष्ट्रीय रुरबन मिशन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत परतूर तालुक्यातील आष्टीसह परिसरातील १६ गावांची निवड करण्यात आली असून यासाठी १८५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून 16 गावात करण्यात येणारी कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच या कामांना गती देण्याचे निर्देश देऊन काम वेळेत न करणाऱ्या तसेच कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

राष्ट्रीय रुरबन योजनेसंदर्भात आष्टी ता. परतूर येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. लोणीकर बोलत होते.

श्री. लोणीकर म्हणाले, परतूर तालुक्यातील आष्टीसह अकोली, आनंदगाव, ब्राम्हणवाडी, सुरुमगाव, ढोकमाळ तांडा, फुलेवाडी, पळसी, हास्तुरतांडा, लिखित पिंप्री, लोणी खुर्द, कनकवाडी, परतवाडी रायगव्हाण, सातारा वाहेगाव व वाहेगाव सातारा या गावांचा राष्ट्रीय रुरबन रुरबन योजनेमध्ये समावेश करण्यात येऊन 185 कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून 16 गावातील नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्यावर भर देण्यात येत आहे. राष्ट्रीय रुरबन अंतर्गत आष्टी-पांडेपोखरी रस्त्यावर राज्यातील पहिली शेतकऱ्यांची मिनी एमआयडीसी उभारण्यात येत आहे. या मिनी एमआयडीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तसेच महिलांच्या बचतगटांना छोटछोटे उद्योग उभे करुन देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला चांगला भावही या माध्यमातून मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय रुरबनअंतर्गत 16 गावात विविध विकास कामे करण्यात येत असून विद्युत विभागाचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले की, 16 गावात वीज सुरळीत होण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आवश्यक त्या ठिकाणी पोल बदलण्याबरोबरच केबलही टाकण्यात येत असून या कामांचा गती देण्यात यावी. शेतकऱ्यांसाठी स्थापन करण्यात येत असलेल्या मिनी एमआयडीसीला अखंडित विजेचा पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस फिडरचे अंदाजपत्रकही सादर करण्याच्या सुचना विद्युत विभागाला यावेळी पालकमंत्री यांनी दिल्या.

रुरबनमध्ये समावेश करण्यात आलेल्या 16 गावात सांडपाणी तसेच घनकचरा व्यवस्थापनचा प्रकल्प करण्यात येणार असून शिवणी या गावामध्ये सांडपाणी व्यवस्थापनाचा उत्कृष्ट असे काम करण्यात आले असल्याचे उदाहरण देत प्रकल्पामध्ये समाविष्ट गावातसुद्धा शिवणीप्रमाणेच कामे करण्याची सुचना देत ज्या-ज्या ठिकाणची कामे प्रलंबित असतील ती येत्या 20 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. बैठकीस जिल्हा परिषद, सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, 16 गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा