महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शासनाच्या योजनांचा लाभ थेट कामागारांपर्यंत पोहोचविणार- संभाजी पाटील निलंगेकर रविवार, १० फेब्रुवारी, २०१९
जालना : शासनामार्फत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शासनाच्या या योजनांचा थेट लाभ राज्यातील कामागारांपर्यंतही पोहोचविण्यात येत असल्याचे प्रतिपादन कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले.भोकरदन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर उमेद व जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचतगटांना कर्जवाटप मेळावा तसेच महाराष्ट्र राज्य व इतर कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्यावतीने सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री. पाटील-निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, श्रीमती आशाताई पांडे, गणेश फुके, तुकाराम जाधव, राजेंद्र देशमुख, डॉ.चंद्रकांत साबळे, सुलोचनाबाई वाघ, कमलबाई पगारे, विनोद गावंडे, विलास आडगावकर, गजानन नागवे, विठ्ठल चिंचपुरे, अजिंक्य वाघ, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चु. श्रीरंगम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ, जिल्हा कामगार अधिकारी टी.ई.कराड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री.पाटील-निलंगेकर म्हणाले, आजघडीला जवळपास साडेबारा लाख कामगार आहेत. त्यामध्ये 30 टक्के महिला आहेत. कामगारांना घरे, आरोग्य तसेच पाल्यांसाठी शिक्षणाचा योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. कामगारांच्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळून त्यांची पाल्य चांगल्या पदावर गेली पाहिजेत, यासाठी कामगार विभागामार्फत भरीव कामगिरी करण्यात येत आहे. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयुष्यमान भारत योजनेमध्ये या सर्व साडेबारा लाख कामगारांचा समावेश करण्यात आला असून या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या योजनांचा लाभ पारदर्शीपणे कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी लाभ थेट कामगारांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्त्री शक्ती ही राष्ट्राची शक्ती आहे. संपूर्ण राज्यभरातील बचतगटांच्या माध्यमातून महिलांना संघटित करुन त्यांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. महिलांच्या बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी तीन कोटी रुपयांचा निधी या गटांना वितरित करण्याबरोबरच गटांसाठी थेट बँकींगच्या व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. उद्योग विकासात महिलांचा सहभाग वाढविण्यावर शासन प्रामुख्याने लक्ष देत आहे. त्या पार्श्वभूमीवर महिला बचतगटांना उद्योगाकरिता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने ‘हिरकणी महाराष्ट्राची’ या योजनेचा शुभारंभ केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री.दानवे म्हणाले, शासन हे गोरगरिबांच्या कल्याणाचे काम करत असून भोकरदन तालुक्यामधील कामगारांना तसेच महिलांना विविध योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येत आहेत. योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्यासाठी 36 कोटी लाभार्थ्यांना बँकेच्यामार्फत थेट त्यांच्या खात्यात लाभ देण्यात येत आहे. महिलांची धुरापासून मुक्तता करण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून केवळ 100 रुपयांमध्ये गॅसचे वाटप करण्यात येत असून देशातील आठ कोटी कुटूंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

प्रास्ताविकात सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चु. श्रीरंगम म्हणाले, जालना जिल्ह्यात नोंदीत कामगारांची संख्या 42 हजार 863 एवढी असून जिवीत कामगारांची संख्या 28 हजार 20 एवढी आहे. यामध्ये 17 हजार 143 पुरुष तर 10 हजार 877 महिला कामगारांची संख्या आहे. जालना जिल्ह्यात आतापर्यंत गृहोपयोगी वस्तु खरेदीसाठी व अवजारे खरेदी करण्यासाठी 24 हजार 951 लाभार्थी कामगारांना 12 कोटी 21 लक्ष 850 रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले असल्याची माहिती यावेळी दिली.

यावेळी आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, श्रीमती आशाताई पांडे, प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, श्रीमती सविता वानखेडे यांनीही विचार व्यक्त केले.

यावेळी रंजनाबाई रामचंद्र बुरंगे व वैशाली चंद्रकांत जाधव या नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतीवर्षी 60 हजार रुपये रक्कमेचे वाटप तर दिलीप हरिभाऊ साळवे, रतन अहेलुबा शिंदे या नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यास पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके आदीसाठी प्रत्येकी 20 हजार रुपये व नोंदीत बांधकाम कामगारांच्या पत्नीस प्रसुती लाभ रक्कम प्रत्येकी 15 हजार रुपयांची मदत आनंद त्र्यंबक पगारे व कडुबा रघुनाथ तळेकर यांना मंत्रीमहोदयांच्या हस्ते देण्यात आली. तसेच अवजार खरेदीसाठी नजीर शहा बेगु शहा, भीमराव देवाजी पगारे, रामदास भीमराव भोंबे, सादियाबी शेख जमील, रामकिसान साहेबराव सोरमारे, संतोष पांडूरंग खडेकर, कैलास चंद्रभान बरकुले, मिरा ताराचंद पवारव शेख इम्रान शेख हमद यांनाप्रत्येकी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. नंदलाल हिरालाल जोरले, अशोक देवराव मगरे, विष्णु माणिकराव वरपे, गिता संजय उसारे यांना प्रातिनिधीक स्वरुपात सुरक्षासंच व अत्यावश्यक संचाचे वाटप करण्यात आले तर शेषराव पुंजाबा सहाणे, सोमिनाथ रामदास वाढेकर, गणेश अशोक मतकर, सुरेश सुपडा निकाळजे यांना नवीन बांधकाम कामगार नोंदणी ओळखपत्राचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. आभार कामगार उपायुक्त शैलेश पोळ यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा