महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सामाजिक विकासाबरोबरच महिलांच्या विकासासाठी विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी - पालकमंत्री पंकजा मुंडे बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९
बीड : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशात विकास होत आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबवली जात आहे. त्यांच्या आदर्शानुसार राज्यात देखील सामाजिक व भौगोलिक विकासाबरोबरच महिलांच्या विकासासाठी विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्राम विकास, महिला व बाल विकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

परळी तालुक्यातील मौजे हाळम येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेतून सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी आणि नळ पाईपलाईन पाणीपुरवठा योजना व पूर्ण झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण पालकमंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळासाठी बांधण्यात आलेल्या सभागृहात तीन सामाजिक सभागृहांचे उद्घाटन तसेच दैठणा - वनवासवाडीच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ३ कोटी ३६ लाख रुपये निधीतून रस्ते कामाचे भूमिपूजन, दौंडवाडी -सतीसावित्री -तांडा- मैंदवाडी या राष्ट्रीय महामार्ग २३० ते जिल्हा मार्ग ९१ या ८ कोटी १५ लक्ष रुपयांच्या रस्ते सुधारणा कामाचे भूमिपूजन आणि पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ या २५ लक्ष रुपयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या इतर मंत्रालयातील विविध योजनांच्या माध्यमातून गावांच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत. रस्ते, शाळा, पाणीपुरवठा योजना, सभागृह अशा विकासासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या कामाबरोबरच लोकांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या स्मशानभूमीसह अनेक कामे करण्यात आली आहेत. हाळम गावातील १६ बचत गटांसाठी प्रत्येकी १ लाख 25 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचे जेव्हा या गावातील महिलांनी सांगितले, त्याचा मला आनंद झाला आहे. राज्यात बचत गटांना खेळत्या भांडवलासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, असे त्या म्हणाल्या.

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, बचत गटातील महिलांना सक्षम करण्यासाठी या निधी बरोबरच कालच दुभत्या व गाभण गाई वाटप करण्यात आले आहे. यातून लाभार्थी प्रत्येक महिलेस दैनंदिन गाई पासून १५ ते २० लीटर दूध मिळू शकते. या दुधाच्या विक्री व्यवसायातून खर्च वजा जाता त्यांना २० हजार रुपयापर्यंत मासिक उत्पन्न मिळेल. गावातील महिला आणि कुटुंब या लक्ष्मीमुळे आनंदात राहतील. महिला बचत गटांसाठी यासह विविध योजना राबविल्या आहेत.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळून वैद्यकीय उपचारांसाठी उपयोग होणार आहे. राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजनेतील व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ करून ती दुप्पट केली आहे, असे पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा