महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मैत्रेय प्रकरणी नागरिकांनी संयम बाळगावा - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर मंगळवार, ०८ जानेवारी, २०१९


सांगली : मैत्रेय प्रकरणी राज्यस्तरावर केंद्रीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. याबाबत रक्कम परताव्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत पुढील आवश्यक कार्यवाहीची रूपरेषा ठरवण्यासाठी आठवडाभरात मुंबईत बैठक घेऊ. गुंतवणूकदारांनी रक्कम परताव्याची खात्री १०० टक्के बाळगावी. मात्र संपूर्ण कार्यवाही होईपर्यंत संयम बाळगावा, असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

पोलीस विभाग, लोकप्रतिनिधी, गुंतवणूकदार व एजंट यांच्याशी पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगिता खोत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खराट, अतिरीक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे आदि उपस्थित होते.

मैत्रेय संदर्भात राज्य स्तरावर केंद्रीय समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीच्या माध्यमातून जाहीर नोटीस (नोटीफिकेशन) काढावी लागते. याच्यासाठी राज्यस्तरावर अधिकाऱ्याची नेमणूक झाली आहे. फॉर्म भरण्यात गोंधळ आहे. त्यामुळे आवश्यक पुरेशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी या प्रकरणात लक्ष घालून त्रुटींची पूर्तता करण्याची ग्वाही दिली आहे, असे सांगून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, या प्रकरणात एका आठवड्यात पुढील कार्यवाहीची रूपरेषा ठरवण्यात येईल. सर्व मालमत्तांच्या नोटीसा झाल्या आहेत. त्यामुळे लिलाव प्रक्रिया झाल्यानंतर संबंधितांना पैसे मिळणार आहेत. मात्र, लिलावात मिळणाऱ्या रकमेवर किती पैसे संबंधितांना परत मिळतील, हे अवलंबून आहे. मालमत्तांच्या लिलावाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. अन्य अडचणी नियमित आढावा बैठका घेऊन सोडवल्या जातील. या प्रकरणातील अडचणी दूर करून मार्ग काढू व न्याय देऊ. मात्र मालमत्ता लिलाव होईपर्यंत संबंधितांनी संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आमदार सुरेश खाडे यांनी याप्रकरणी लोकांच्या भावनांविषयी अवगत केले. पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. उपस्थित गुंतवणूकदार, एजंट, महिला यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा