महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सामान्‍य ना‍गरिकांना न्‍याय देण्‍यासाठी ‘डायल युवर पोलीस ऑफीसर’ उपक्रम उपयुक्‍त - प्रा.राम शिंदे शनिवार, ०७ जुलै, २०१८
अहमदनगर : ‘डायल युवर पोलीस ऑफीसर’ हा राज्‍यातील पहिलाच उपक्रम असून अहमदनगर जिल्‍ह्यात या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. सामान्‍य नागरिकांना न्‍याय देण्‍यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्‍त ठरेल, असा विश्‍वास पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी व्‍यक्‍त केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सायबर सेल कार्यालय नुतनीकरणाचे उद्घाटन व राज्‍यातील पहिल्‍या ‘डायल युवर पोलीस ऑफीसर’ या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री प्रा.शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक घनःशाम पाटील, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक रोहीदास पवार, सहा.पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, सायबर सेलचे पोलीस निरिक्षक सुनिल पवार आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री प्रा.शिंदे म्हणाले, डायल युवर पोलीस ऑफीसर उपक्रम राज्‍यातील पहिलाच उपक्रम असून नगर जिल्‍ह्यात हा उपक्रम निश्चितच उपयुक्‍त ठरणार आहे. या माध्‍यमातून पोलीस अधीक्षक ते पोलीस अधिकारी यांच्‍याशी थेट संपर्क साधता येणार आहे. गुन्‍हेगारीवर नियंत्रण मिळविण्‍यासाठी या उपक्रमाचा नक्‍कीच उपयोग होईल.

सायबर पोलीस स्‍टेशनमुळे गुंतागुंतीच्‍या गुन्‍ह्यांचा तपास करण्‍यात जिल्‍हा पोलीस दलाला यश आले असून गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून गुन्हेही टाळता येणार असल्याचे प्रा.शिंदे यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी डायल युवर पोलीस ऑफीसर उपक्रम निश्चितच नागरिकांना आधार वाटेल, असा विश्वास व्यक्त करून या उपक्रमामुळे जनतेसोबत संपर्क साधणे सुलभ होणार असल्‍याचे सांगितले. प्रास्ताविक श्रीमती गिता कळमकर यांनी केले.

यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्‍या हस्‍ते जिल्‍ह्यातील पोलीस ठाण्‍याच्‍या प्रभारी अधिकाऱ्यांना मोबाईल हॅण्‍डसेट व सीमकार्ड देण्‍यात आले. यावेळी जिल्‍ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा