महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
क्रांतीसिंह नाना पाटील कृषि महाविद्यालयातून कृषी व स्पर्धा परीक्षेला दिशा मिळेल - राज्यमंत्री खोत रविवार, १९ मार्च, २०१७
महाविद्यालयात नवीन वाणाच्या प्रयोगासह बियाणे बँक करणार
क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या भव्य पुतळ्याबरोबरच सुसज्ज बगिचा

सांगली :
क्रांतीसिंह नाना पाटील यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान होते. त्याचप्रमाणे शेतकरी चळवळीतही ते नेहमी अग्रभागी राहिले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही क्रांतीसिंहांनी शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांसाठी लढा दिला. त्यामुळे पेठ येथील कृषि महाविद्यालय क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नावे सुरू करण्यात येत असल्याचा आपणास सार्थ अभिमान आहे. हे कृषि महाविद्यालय एक प्रकारे क्रांतीसिंहांचे विचार व कार्याचे स्मारक असेल. तसेच, या कृषि महाविद्यालयातून शेतीप्रधान वाळवा तालुक्यातील तरूणांना कृषिविषयक ज्ञान, तंत्रज्ञान यांच्या अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठीही दिशा मिळेल, असा विश्वास कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज व्यक्त केला.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठ येथे क्रांतीसिंह नाना पाटील कृषि महाविद्यालय सुरू करण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी गेले दोन महिने सतत पाठपुरावा केला. त्याला यश येऊन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात कृषि महाविद्यालयाची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज लगेचच क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावी येडे मच्छिंद्र येथे जाऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, वाळवा पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजी पाटील, जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, येडे मच्छिंद्रचे सरपंच संजय पाटील, वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी, सागर खोत, जयवंत पाटील, धनंजय रसाळ, जयराज पाटील, संग्राम पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कृषि व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, वाळवा तालुक्यात अनेक शिक्षण संस्था, दूध संघ तसेच मजबूत सहकार चळवळ आहे. प्रगतीच्या दिशेने जाणारा आणि शेतीप्रधान तालुका असूनही या तालुक्यात शासकीय कृषि महाविद्यालयाची कमतरता होती. कृषि महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांची पायाभरणी होती. त्यामुळे कृषि महाविद्यालयाअभावी येथील तरूणांना स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणावे तसे यश मिळत नव्हते. या पार्श्वभूमिवर पेठ येथे कृषि महाविद्यालयाच्या मंजुरीमुळे परिसरातील युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी दिशा मिळेल.

वाळवा तालुक्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रांतीसिंह नाना पाटील आणि या तालुक्यातील क्रांतीकारकांचा इतिहास ज्ञात व्हावा. पालक, विद्यार्थ्यांनी त्यांच्या चरणी मस्तक टेकवावे आणि अशा क्रांतीसिंहांच्या नाव असलेल्या महाविद्यालयात आपला पाल्य शिकत असल्याचा अभिमान पालकांच्या मनी निर्माण व्हावा. या माध्यमातून क्रांतीसिंहांच्या विचारांचे व कार्याचे स्मरण होईल, अशी भूमिका असल्याचे स्पष्ट सदाभाऊ खोत म्हणाले, या कृषि महाविद्यालयात दोन एकर जागा विकसित करून तेथे क्रांतीसिंह नाना पाटील यांचा भव्य पुतळा आणि एक सुसज्ज बगिचा तयार करण्यात येणार आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा