महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गेल्या वर्षी 57 हजार किलोमीटरचे रस्ते खड्डेमुक्त - सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील गुरुवार, १७ मे, २०१८
कोल्हापूर : राज्यात रस्ते विकासावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले असून गेल्या वर्षी राज्यातील 57 हजार किलो मीटरचे रस्ते खड्डेमुक्त केले आहेत. ग्रामीण भागातील 30 हजार किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हाती घेतले आहेत. हे रस्ते अधिक दर्जेदार होण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांनी सामाजिक भुमिकेतून लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने नव्यानेच कार्यान्वित केलेल्या रोड प्रोग्रेस मॉनिटरींग सेल अर्थात वॉर रुमचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक आदी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांच्या कामासाठी निर्माण केलेल्या वॉररुमच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेत राज्यातील पहिलीच वॉर रुम कार्यान्वित झाली आहे. या उपक्रमामुळे रस्त्यांची कामे अधिक पारदर्शी आणि दर्जेदार होतील, असा विश्वास व्यक्त करुन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात 2 लाख 56 हजार किलो मीटरचे ग्रामीण रस्ते असून हे रस्ते प्रामुख्याने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या उद्देशाने केल्याने काही ठिकाणी हे रस्ते खराब झाले आहेत. हे रस्ते अधिक दर्जेदार बनविण्यासाठी शासनामार्फत पुढाकार घेतला असून राज्याच्या ग्रामीण भागातील 30 हजार किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हाती घेतले आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील अतिवृष्टी व पूरहानी तसेच वाहतूक वर्दळीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 12 कोटी 50 लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून 185 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे. यातून जिल्ह्यातील 652.60 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम होणार आहे.

जिल्हा परिषदेचे काम हे स्वत:चे काम समजून सामाजिक भुमिकेतून अधिक दर्जेदार करण्याची दक्षता लोकप्रतिनिधींनी घ्यावी. या कामांमध्ये हेतुपुरस्पर हलगर्जीपणा आणि टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय करु नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, शिक्षण सभापती अंबरिषसिंह घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन बांधकाम सभापती सर्जेदार पाटील (पेरिडकर) यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा