महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वृक्ष लागवड कार्यक्रम लोकचळवळ व्हावी - पालकमंत्री बबनराव लोणीकर शनिवार, ०६ जुलै, २०१९

जालना : वनक्षेत्राच्या कमतरतेमुळेच मराठवाड्यासह जिल्ह्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे.  वनक्षेत्र कमी असल्यामुळेच आपणाला सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.  वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा लोकचळवळ होऊन अधिकाधिक वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री बबनराव लोणीकर व राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते जैवविविधता उद्यान जालना येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

व्यासपीठावर पदुम व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, अभिमन्यू खोतकर, भाऊसाहेब घुगे, पंडित भुतेकर, आत्मानंद भगत, घनश्याम गोयल, संदीप नाईकवाडे, दीपक राठोड, विरेंद्र धोका, विजय पवार, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी पी.व्ही. जगत आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री.लोणीकर म्हणाले, राज्याचे वनक्षेत्र वाढविण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या पुढाकाराने संपूर्ण राज्यात वन विभागाच्यावतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम गेल्या चार वर्षापासुन सुरु आहे.  गत चार वर्षात संपूर्ण राज्यात 20 कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली असून येत्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. पालकमंत्री श्री.लोणीकर म्हणाले की, वनक्षेत्राच्या कमतरतेमुळे मराठवाड्यासह जिल्ह्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे.  वनक्षेत्र कमी असल्यामुळेच आपणाला सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.  मराठवाड्यासह जिल्ह्यात पाऊस पाडण्यास कारणीभूत असलेल्या अधिकाधिक वृक्षांची लागवड केल्यास भविष्यात दुष्काळी परिस्थितीवर आपण कायमस्वरुपी मात करण्यात यशस्वी ठरु शकतो. यासाठी  संपूर्ण राज्यात वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन या उपक्रमात सहभागी होण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

जालना जिल्हा हरित करण्यासाठी घनदाट वृक्ष लागवड करा राज्यमंत्री श्री.खोतकर

राज्यमंत्री श्री.खोतकर म्हणाले की, जालना जिल्ह्यात  1 जुलै ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत 1 कोटी 5 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक प्रमाणात वृक्षांची यशस्वीपणे लागवड सर्वांच्या सहकार्यातून निश्चित पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करत केवळ वृक्ष लागवड करुन चालणार नाही तर त्या वृक्षांचे संगोपनही करणे तितकेच गरजेचे असून संपूर्ण जिल्ह्यात घनदाट वृक्ष लागवड करुन संपूर्ण जिल्हा हरित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मनरेगाच्या माध्यमातूनही यशस्वीरित्या वृक्ष लागवड करता येणे शक्य असुन गोलापांगरी या गावात याच योजनेच्या माध्यमातून एक हजार वृक्षांची लागवड करुन त्यांचे संगोपन करण्यात येत आहे.   या माध्यमातुन मजुरांना रोजगार मिळण्याबरोबरच वृक्षांची चांगल्या प्रकारे निगा राखता येणे शक्य असल्याने संपुर्ण जिल्ह्यात मनरेगाच्या माध्यमातुन वृक्ष लागवडीवर भर देण्याची गरज असल्याचे सांगत ही वृक्ष लागवड मोहिम केवळ शासकीय उपक्रम न राहता सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह समाजातील स्वसंसेवी संस्था, उद्योगपती, नागरिक यांनी या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही राज्यमंत्री श्री.खोतकर यांनी यावेळी केले. 

यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर व राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीना मोफत रोपे वाटपाचा हिरवी झेंडी दाखवुन मंत्री महोदयांच्या हस्ते शुभारंभही करण्यात आला.

कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा