महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
‘डिजिटल हरिसाल’ची वाटचाल आता आर्थिक स्वयंपूर्णतेकडे सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७
अमरावती : देशातील पहिले डिजिटल ग्राम हरिसालची आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल होण्यासाठी बचत गटांच्या माध्यमांतून लघु उद्योगांची पायाभरणी केली जात आहे. गावातील बचत गटांची संख्या 6 वरुन 18 वर जाऊन पोहोचली आहे.

नव्या पिढीला तंत्रज्ञानाचे बळ पुरविण्याबरोबरच स्थानिकांच्या रोजगार निर्मितीसाठी लघुउद्योगाचा प्रारंभ गाव स्वयंपूर्ण होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी व्यक्त केली. गावात योजनांच्या अंमलबजावणीवर जिल्हा प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे. दर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून हरिसाल येथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. पालकमंत्री श्री. पोटे-पाटील यांच्याकडूनही पाठपुरावा केला जात आहे.

डिजिटल लर्निंग स्कुलमधील प्रशिक्षणाचा लाभ जिल्हा परिषदेची शाळा, अंगणवाडी, आश्रमशाळा यांच्यासह परिसरातील विद्यार्थ्यांनाही होत आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत डिजिटल स्कुलमध्ये 12 विद्यार्थ्यांची नवी तुकडी कार्यान्वित होत आहे. येथे नव्याने लेखा संगणकीय प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरु होत आहे. आश्रमशाळेतील 394 विद्यार्थी ई-लर्निंगचा लाभ घेत आहेत, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक सोपान घोरमाडे यांनी दिली. ई-लर्निंगद्वारे विविध अभ्यासक्रम ऑफलाईन पद्धतीने शिकविले जातात. त्याचप्रमाणे गरज पडल्यास ऑनलाईन सर्चसाठी पुरेसा डेटाही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. डिजिटल प्रकल्पासाठी अमेरिकेतून मास्टर्स इन अर्बनप्लॅनिंगची पदवी प्राप्त तज्ज्ञ श्रीया रंगराजन व सहाय्यक जीतेंद्र शनवारे या पुर्णवेळ कार्यरत आहेत. हरिसाल येथील टेलिमेडिसीन केंद्राचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. एप्रिल 2017 पासून आतापर्यंत विशेषोपचारासाठी 100 हून अधिक रुग्णांनी, तर नेत्र उपचारासाठी 650 रुग्णांनी लाभ घेतला, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिली.

‘मदर डेअरी’ने गावाचा सर्च केला असून लवकरच दुग्ध प्रक्रिया प्रकल्प सुरु होईल. कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण 10 जणांना देण्यात आले आहे. रोजगार निर्मितीसाठी पर्यटक निवास व्यवस्था उभारण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची मदत पाचजणांना देण्यात आली आहे. पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा परिचय व्हावा म्हणून स्थानिक 15 कलावंतांचे पथक निर्माण करण्यात आले आहे.

गाव डिजिटल झाल्यानंतर व्यवहारांना चालना मिळवून उपाहारगृहे, फळ दुकाने, ई-सुविधा केंद्रे आदी व्यापार वाढला आहे. बचत गटांना मिनी डाळमिल, पेपर द्रोण मशिन, बेसन आटा चक्की, पापड मशिन, मिरची कांडप यंत्र आदिंचे वाटप करण्याबरोबरच जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 18 बायोगॅस सयंत्राचे वाटप, 150 हून अधिक स्वच्छतागृहे, शेताला जाळीदार कुंपणासाठी अर्थसहाय्य, सौंदर्यीकरणासाठी उद्यान, कचरा निर्मुलनासाठी डंपिंग ग्राऊंड, ग्रामस्थांना मधमाशीपालन, रायमुनीयापासून फर्निचर निर्मीतीचे, तर 120 जणांना शिवणकाम प्रशिक्षण आदी सुविधा देण्यात येत आहेत. गाव डिजीटली अद्ययावत करण्याबरोबरच आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे श्री. पोटे-पाटील यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा