महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पूरस्थितीत शासन व प्रशासनाला सर्वांचे सहकार्य मिळत आहे - मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख शुक्रवार, ०९ ऑगस्ट, २०१९

पुणे : राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगलीची स्थिती मात्र गंभीर आहे. तथापी, शासन व प्रशासन अतिशय गांभीर्याने काम करीत आहे. याकामी नागरिकांचेही सहकार्य मिळत आहे. अशाप्रसंगी संयम राखण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सहकार, मदत व पूनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

मंत्री श्री.देशमुख म्हणाले, आपण नुकताच सांगली जिल्ह्याचा दौरा करून आलो आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. तत्पूर्वी 6 ऑगस्ट रोजी पुण्यात पुणे विभागाची संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना केल्या.आजही विभागीय आयुक्तांबरोबर बैठक घेऊन सूचना केल्या.

सध्या मदत बचाव व मदतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्र व अन्य राज्य सरकारची मदत घेण्यात येत आहे. पुराने बाधित हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रशासन  उत्तमरित्या काम करीत आहे. त्यांना अनेक स्वंयसेवी संस्था सहकार्य करीत आहेत.

आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारशी यंत्रणा समन्वय ठेवून आहेत.

धान्य, औषध पुरवठा करण्यात येत आहे. फूड पाकिट व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत असून आपण नियंत्रकेच्या भूमिकेतून काम करीत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, मदत व बचावासाठी बोटी मागविण्यात आल्या आहे. अनेक पथक व जवान त्याठिकाणी काम करीत आहे.अशावेळी संयम राखणे आवश्यक आहे. अफवांवार विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा