महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
युवकांनी राष्ट्रवादहित निष्ठा जोपासून देशाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करावेत -पालकमंत्री बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९


निलंगा येथे १०५ फूट उंच राष्ट्रध्वज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे थाटात लोकार्पण

लातूर :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातून सामाजिक एकतेचा संदेश मिळतो. तर राष्ट्रध्वजामुळे राष्ट्रभक्ती निर्माण होते. त्यामुळे युवकांनी मनामध्ये राष्ट्रवादहित निष्ठा जोपासून तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत कुशलतेने करून देशाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, माजी सैनिक कल्याण व कौशल्य विकास मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

निलंगा नगर परिषदेच्या वतीने निलंगा येथे आयोजित १०५ फूट उंचीचा राष्ट्रध्वज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत अरविंद पाटील निलंगेकर, निलंगा पंचायत समिती सभापती अजित माने, मोहन माने, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपविभागीय अधिकारी विकास माने, मोहन माने, भन्ते आदी उपस्थित होते.

श्री. निलंगेकर म्हणाले की, संविधानामुळे समाजातील प्रत्येक घटक एका विचाराने राहत आहे तर राष्ट्रध्वजामुळे सर्वजण एकत्रित येतात. युवकांनी आपली स्वप्न पूर्ण करावीत व खूप प्रगती करावी. परंतु राष्ट्र व राष्ट्रहित कायमस्वरूपी हृदयात राहील व त्यातून राष्ट्रहितवाद निष्ठा जोपासावी. तसेच जगातील सर्व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर युवकांनी करून देशाचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

युवकांनी आपण सर्वजण एक आहोत हा संदेश सर्वत्र पोहोचावा. तसेच परकीय शक्तीपासून देशाच्या संरक्षणासाठी युवकांनी नेहमी तत्पर रहावे व कधीही कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निलंगेकर यांनी केले. निलंगा येथील टाऊन हॉलमध्ये उभारण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा हा कोणत्याही ‘क’ वर्ग नगरपालिका क्षेत्रात देशपातळीवर उभारण्यात आलेला सर्वात उंच पुतळा असल्याचे त्यांनी सांगून पुतळा व राष्ट्रध्वज निर्माण बाबत निलंगा नगरपालिकेच्या कामाचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व एकशे पाच फूट उंचीचा राष्ट्रध्वज लोकार्पण सन्मान आपल्याला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून हा क्षण संपूर्ण निलंगावासियांसाठी ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच निलंगा शहरासह जिल्ह्यात इतर तीन ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची उभारणी होत असल्याची माहिती निलंगेकर यांनी दिली. तसेच निलंगा शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचाही पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

भारतीय संविधानामुळे वंचित घटकांना जागृत करून न्याय देण्याचे काम होत आहे तसेच एकसंघ राष्ट्र निर्माण करण्याचे काम ही संविधानाच्या माध्यमातून होत असल्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले. तसेच संविधानातील ३७० कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता अशी माहिती त्यांनी दिली.

प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे काम राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून होत असते असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगून भारतीय संविधानाचा आत्मा असलेली प्रस्ताविका प्रत्येकाने आत्मसात करून त्याचे अनुपालन करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व शिक्षणाला होते व शिक्षणाच्या माध्यमातूनच ते भारतीय संविधान निर्माण करू शकले. या संविधानाच्या माध्यमातून भारताची अखंडता कायम असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचाराचे प्रत्येकाने पाईक होऊन स्वतःची शैक्षणिक उन्नती साधण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.

निलंगा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राष्ट्रध्वज निर्माण करणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे याचा उद्देश त्यांनी सांगितला. तसेच राष्ट्रध्वजामुळे राष्ट्रीय भावना सतत तेवत राहील तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणी म्हणजे निलंगवासियासाठी स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रारंभी पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते निलंगा पंचायत समितीच्या आवारात निर्माण करण्यात आलेल्या १०५ फूट उंचीच्या राष्ट्रध्वज व टाऊन हॉल येथे उभारण्यात आलेल्या १२ फूट उंचीच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी निलंगा शहर व तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन केले. तसेच यावेळी विद्यार्थ्याकडून राष्ट्रध्वजाची लहर निर्माण करण्यात आली. या लोकार्पण कार्यक्रमास निलंगा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचा समारोप हा राष्ट्रगीताने झाला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा