महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राज्यात ३ वर्षात ३० हजार कि.मी. चे ग्रामीण रस्ते - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे सोमवार, ०७ जानेवारी, २०१९

सन 2010 पूर्वीची ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमित करणार
औसा पंचायत समितीचे ना.मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण


 

लातूर : राज्याची ग्रामीण भागातील सन 2010 पूर्वीची सर्व अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत. तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत राज्यात तीन वर्षात 30 हजार किलो मिटर लांबीच्या रस्त्यांना मंजूरी दिली असून यातून ग्रामीण रस्ते, मुख्य रस्त्यांना जोडून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला जाणार आसल्याचे प्रतिपादन ग्राम विकास आणि महिला बाल विकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.

औसा पंचायत समितीच्या नवीन  इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती मुंडे बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ.सुनील गायकवाड, आमदार सर्वश्री सुरेश धस, बसवराज पाटील, सुधाकर भालेराव, मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय अभिमन्यू पवार, राज्य कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, माजी आमदार गोविंद केंद्रे, रमेश कराड, जि.. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन  इटनकर, प्रविक्षाधिन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, औसा पंचायत समिती सभापती दत्तोपंत सुर्यवंशी आदिंसह इतर मान्यवर उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री मुंडे म्हणाल्या की, शासन लवकरच राज्यातील ग्रामीण भागातील सन 2010 पूर्वीची  सर्व अतिक्रमणे नियमीत करणार आहे. तर त्यानंतरची अतिक्रमणे रेडी रेकनर  दराप्रमाणे  रक्कम घेऊन  नियमीत केली जाणार आहेत. यामुळे ग्रामीण  भागातील गोरगरीब  नागरिकांना स्वत:च्या हक्काची जागा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून  तीन वर्षात  30 हजार किलो मीटरच्या ग्रामीण रस्त्यांचे  जाळे निर्माण झाले असून यामुळे  प्रत्येक गाव मुख्य रस्त्यांशी पर्यायाने त्या भगातील मुख्य बाजारपेठेशी जोडले जाणार असल्याचे मत श्रीमती  मुंडे  यांनी व्यक्त केले. त्याप्रमाणे या योजनेंतर्गत लातूर  जिल्ह्याला 773 कि.मी. चे रस्ते मंजूर  करुन त्यासाठ 443 कोटीचा निधी  दिला. तर फक्त औसा विधानसभा मतदार संघात 92 कि.मी. चे रस्ते त्यासाठी 39 कोटीचा निधी  दिल्याची माहिती त्यांनी दिली.

त्याप्रमाणे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत आर ॲन्ड डी निधीतून सुमारे 46 कोटी मंजूर केले असून औसा तालुक्यातील  ग्रामपंचायतीसाठी  पंचवीस-पंधरा निधीतून कामे मंजूर केली असल्याची माहिती मुंडे यांनी देऊन हे शासन विकास कामाबरोबरच मनुष्य बांधणीचे काम करत असल्याचे त्यांनी  सांगितले.

शासनाच्या विविध घरक योजनेतून 12 हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ मिळून घरकुलाची कामे पूर्ण झाली असून लातूर ही कामे पूर्ण करण्यात राज्यात तिसरा क्रमांक असल्याचे पालकमंत्री निलंगेकर यांनी सांगून प्रत्येक बेघर व्यक्तीला घरकू देण्याची शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लातूर जिल्हा सध्या दुष्काळी परिस्थितीला  सामोरे जावे लागत असून  दुष्काळ ही संधी  यातून दुष्काळ निवारण्यासाठी  तात्पुरत्या योजनांऐवजी  कायमस्वरुपी  उपाय योजना करण्यासाठी सर्वांनी पक्षीय  राजकारण बाजूला ठेवून एकत्रीत यावे. त्याप्रमाणेच  उजनीचे पाणी लातूरसह मराठवाडयाला मिळण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रीतपणे पाठपुरावा  करावा, असे आवाहन श्री. निलंगेकर यांनी केले. यावेळी  आमदार बसवराज पाटील यांनी ही मार्गदर्शन केले.

प्रारंभी  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फीत कापून नाम फलकाचे अनावरण करुन औसा पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण केले. तसेच औसा विधानसभा मतदार संघातील  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांचे -भूमीपूजन पूर्ण झालेल्या कामांचे -लोकार्पण केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संवादतज्ञ द्ध फड तर आभार गट विकास अधिकारी  तुकाराम भालके यांनी  मानले.

पंचायत समिती  सभापतीला विकास निधी

राज्यातील सर्व पंचायत समिती  सभापती सदस्यांना विकास कामांसाठी  निधी असावा हया मागणीला ग्रामविकास  मंत्री  पंकजा मुंडे  यांनी  सहानुभूती दर्शविली.

यावेळी मराठवाडयातील सर्व पंचायत समिती सभापती बैठकीस उपस्थित होते. निलंगा पंचायत समिती सभापती अजित माने यांनी सभापती सदस्यांना विकास निधी, नरेगाची  कामे  मंजुरीचा अधिकार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी मतदानाचा अधिकार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्यत्व, 13 व्या वित्त आयोगाप्रमाणेच 14 व्या वित्त आयोगात अधिकार असणे, बीडीओ सभापती  संयुक्त खाते असणे आदि मागण्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे  केल्या. या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करु, असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा