महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
खासदार संजय जाधव यांनी केला परभणीतील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८
नवी दिल्ली : खासदार संजय जाधव यांनी परभणी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक डॉ.अवधूतराव डावरे आणि वसंत अंबुरे यांचा राजधानी दिल्लीत आज सन्मान केला.

क्रांतिदिनाचे औचित्य साधून ‘भारत छोडो’ आंदोलन व ‘हैद्राबाद मुक्ती आंदोलनात’ मोलाचे योगदान देणाऱ्या या उभय स्वातंत्र्य सैनिकांचा गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे सन्मान करण्यात आला. या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांनी येथील गोमती अपार्टमेंटमधील निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ क्रांती जाधव उपस्थित होत्या. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान उभय स्वातंत्र्य सैनिकांनी ‘भारत छोडो’ आंदोलन व हैद्राबाद मुक्ती आंदोलनातील आठवणींना उजाळा दिला.

डॉ.अवधूतराव डावरे यांनी 1938 ते 1948 पर्यंत झालेल्या विविध आंदोलनात घेतलेल्या सहभागाबाबत आठवणी सांगितल्या. देशात 1942 मध्ये झालेल्या ‘चले जाव’आंदोलनात सत्याग्रहींना मार्गदर्शन करण्याचा तसेच परभणीमध्ये झालेल्या या आंदोलनाचे नियोजन करण्याचा अनुभव त्यांनी यावेळी विशद केला. या आंदोलनाविषयी जागृती करून त्यांनी परिसरातील इंग्रजी शाळा, महाविद्यालये बंद पाडले. विदेशी वस्त्र आणि वस्तुंची होळी केली होती. झेंडा सत्याग्रहातही श्री.डावरे यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. डॉ.डावरे यांना इंग्रज सरकारने दोन वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा ठोठावली होती. हैद्राबाद मुक्ती संग्रामात त्यांनी लोणी कॅम्पमध्ये रझाकारांशी मुकाबला केला होता या विषयीही त्यांनी आपले अनुभव मांडले.

वसंतराव अंबुरे यांचे वडील चंद्रनाथराव अंबुरे हे सक्रीय स्वातंत्र्य सैनिक होते. 1947 मध्ये वसंतराव अंबुरे यांचे वडिल परभणी आणि औरंगाबाद येथील तुरूंगात होते. त्यावेळी वसंतराव अंबुरे यांनी भूमिगत राहून स्वातंत्र्य संग्राम चळवळीत योगदान दिले. हैद्राबाद मुक्ती संग्रामातही श्री.अंबुरे यांनी सक्रीय सहभाग घेतला होता, हे सर्व अनुभव त्यांनी यावेळी कथन केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा